जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचे हे शिकवले जाते. त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचे ओझे वाहत असतो. मात्र योग्य वेळी हे ओझे उतरवून ठेवायलासुद्धा शिकले पाहिजे. हे ज्ञान आपल्याला संत, महंत आणि अध्यात्मिक गुरूंकडून मिळते. तरुण सागर महाराज हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते.
- सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराज यांची ओळख होती. 'कडवे प्रवचन' ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध आहे. आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल त्यांनी मांडलेले विचार अनुकरणीय होते. अशातच त्यांनी चाळीशी ओलांडलेल्या तसे त्यापेक्षा मोठ्या आणि छोट्या वयाच्या लोकांना संदेश दिला आहे-
- दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट सोडून चालणे सोडा.
- विसाव्या वर्षी खेळण्यांसाठी भांडणे सोडा.
- तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणे सोडा.
- चाळीसाव्या वर्षी रात्रीचे जेवण सोडा.
- पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे सोडा.
- साठाव्या वर्षी व्यवसाय तसेच नोकरी सोडा.
- सत्तराव्या वर्षी पलंगावर झोपणे सोडा.
- ऐंशीव्या वर्षी तामसी भोजन सोडा.
- नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा.
- शंभराव्या वर्षी हे जग सोडा.
साधू मुनी कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसे जगू शकतात, याचे गुपितच जणू काही तरुण सागर महाराजांनी आपल्याला वरील संदेशातून सांगितले आहे. त्यावर नीट विचार केला असता लक्षात येईल, की आपण आता वयाच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर आपल्याला कोणत्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि निस्पृहतेचा मार्ग धुंडाळायला शिकायचे आहे. एखाद्या गोष्टीचा मोह सोडणे सोपे नाही, परंतु मोहाचा क्षण सोडला तर मोक्षही दूर नाही!