ज्योत्स्ना गाडगीळ
प्रेमात पडलेल्या व्यक्तीला अनेकदा मनात हा संभ्रम निर्माण होतो, की समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटत आहे, ते प्रेम आहे की आकर्षण? प्रेमाबद्दल आपण बरेच काही ऐकलेले असते, परंतु प्रत्यक्ष अनुभवताना अनेक गोष्टींमुळे मनात द्वैत निर्माण होते. ते दूर करताना गौर गोपाल दास प्रभू एक छान गोष्ट सांगतात.
एकदा एक बाई आपल्या बाळाला घेऊन बागेत फिरायला जाते. तिथे आणखीही अनेक लहान मुले खेळत असतात. बाळ त्यांच्यात छान रमले आहे पाहून ती सोबत आणलेली लोकर आणि क्रोशाची सुई घेऊन बाळासाठी स्वेटर विणायला सुरुवात करते. विणत असताना तिची तंद्री लागते. खेळता खेळता मुलांचा आवाज कमी होतो आणि ती भानावर येते. तिची नजर बाळाला शोधते. तेवढ्यात एक बाई तिच्या बाळाला घेऊन लगबगीने बागेतून बाहेर जाताना दिसते. हातातल्या सगळ्या गोष्टी तशाच टाकून आई धावत जाते आणि त्या बाईला अडवते. बाळाला आपल्या ताब्यात घेऊ पाहते.
हेही वाचा : एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...
बाळाला नेणारी बाई भांडून, ओरडून लोकांचे लक्ष वेधून घेते. ते बाळ आपलेच आहे असे दर्शवते आणि बाळ मागणारी बाई आपले बाळ पळवून नेत असल्याचा उलट आरोप करते. ते ऐकून बाळाची खरी आई रडकुंडीला येते. दोघी जणी ते बाळ आपलेच आहे, असे सांगत असल्याने बाळाची आई कोण, असा लोकांनाही प्रश्न पडला. बागेतली मुलेदेखील बाळाच्या आईच्या बाजूने बोलायला तयार होईना. दैव अशी परीक्षा का घेत आहे, अशा विचाराने ती रडून रडून आपले बाळ परत मागत होती.
त्या दोघींच्या भांडणाचे आवाज ऐकून बाळही जोरजोरात रडायला लागते. तेवढ्यात तिथून एक पोलिस जात असतात. भांडणाचा आवाज ऐकून ते मध्यस्थी करतात. दोघींची बाजू ऐकून घेतात. तेही संभ्रमात पडतात. ते बाळाला आपल्या ताब्यात घेतात. आणि जमीनीवर एक रेघ काढतात. त्या रेषेच्या मध्ये बाळाला धरतात आणि दोन्ही बायकांच्या हाती बाळाचा एक एक हात सोपवून सांगतात, जो बाळाला आपल्याकडे ओढून घेईल, त्याचे बाळ असेल.
शर्यत सुरू होते. दोघी प्रयत्न करतात. पण बाळाचे नाजूक हात अधिक ओढले जाऊ लागल्यामुळे बाळ पुन्हा भोकाड पसरते आणि रडून लालेलाल होते. ते पाहता, बाळाच्या खऱ्या आईला बाळाच्या वेदना सहन होत नाहीत आणि ती बाळाचा हात सोडून देते. बाळ रडायचे थांबते, परंतु त्याचे हुंदके सुरूच असतात. बाळाला आपल्या बाजून ओढून घेतले पाहून, बाळाला पळवून नेणारी बाई आनंदून जाते. निकाल लागलेला असतो. पोलीस लोकांकडे बघत विचारतो, तुम्हाला काय वाटते, कोण असेल बाळाची आई? लोक सांगतात, जिने बाळाला आपल्याकडे ओढून घेतले ती!
त्याच गर्दीतून एक बाई पुढे येत म्हणते, नाही! जिने बाळाला ओढून घेतले, ती आई असूच शकत नाही, तर जिला बाळाच्या वेदना सहन झाल्या नाहीत, तीच बाळाची खरी आई आहे. पोलींसांनी त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि बाळाला त्याच्या खऱ्या आईच्या हाती सुपूर्द केले. आई आनंदाने आणखीनच रडू लागते आणि बाळाचे मुके घेते.
गौर गोपाल दास प्रभू सांगतात, याला म्हणतात प्रेम. ज्यात हक्क महत्त्वाचा नसून समर्पणाची भावना असते. प्रेम ओरबाडण्यात नाही, तर देण्यात आहे. आकर्षण क्षणाचे असते, प्रेम चिरंतन असते. कोणत्याही घटनेने, प्रसंगाने, गैरसमजाने बिथरते, त्याला प्रेम म्हणत नाहीत, तर जे चिरकाल टिकते, तसूभरही कमी न होता वाढतच जाते, त्याला प्रेम म्हणतात. आजच्या काळात असे प्रेम सापडणे दुर्मिळ आहे.
प्रेमाची व्याख्या एका वाक्यात सांगायची, तर तुम्हाला फुल आवडते म्हणून तुम्ही ते खुडता, हे आकर्षण आणि तुम्हाला फुल टिकून राहावेसे वाटते म्हणून तुम्ही त्या रोपाला पाणी घालता, हे प्रेम!