समर्थ रामदास स्वामी म्हणजे मराठी शब्दकोशाचे विस्तृत भांडारच. शब्दनिर्मिती कलाही त्यांना अवगत होती. म्हणूनच त्यांच्या काव्यात, साहित्यात वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग आढळून येतो. जसे की, समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली महादेवाची आरती आपण नेहमी म्हणतो. त्या आरतीची सुरुवातच ज्या शब्दप्रयोगाने झाली आहे, तो शब्द अन्य कोठे वापरलाच गेला नाही, हे प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिले. चला, आपणही जाणून घेऊया समर्थांचा शब्द महिमा आणि महादेवाच्या आरतीचे माहात्म्य!
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा,लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा।।जय देव जय देव, जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा।।
समुद्रमंथनातून हलाहल निघाले, तेव्हा ब्रह्मांड लवथवले, म्हणजेच हलून गेले. केवळ एक ब्रह्मांड नाही, तर ब्रह्मांडांची शृंखला, माळा हादरून गेल्या. ते हलाहल पिण्याची शिवशंकरांनी तयारी दर्शवली आणि ते प्राशन केल्यामुळे जणू काही त्यांच्या देहातून, डोळ्यातून दाह निघू लागला. तो शांत करण्यासाठी त्यांनी आपल्या जटांमध्ये बाळा म्हणजे गंगा धारण केली तिच्यातून झुळूझुळू निघणाऱ्या पाण्यामुळे शंकरांवर अभिषेक होऊ लागला. अशा कापूराप्रमाणे शुभ्र कांती गौर वर्ण असलेल्या शिवशंकरा तुझी आरती ओवाळतो.
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा,विभुतीचे उधळण, शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा।।
कर्पुरगौरा शब्दाची समर्थांनी द्विरुक्ती केली आहे. आधीच्या कडव्यात या शब्दाचा संदर्भ गौरवर्ण असून हलाहल प्राशन करून निळा ठिक्कर पडलेला, अशा दृष्टीने आहे, तर या कडव्यात हिमकन्या पार्वतीला शोभून दिसेल, असा त्याचा कर्पुरगौर वर्ण आहे, असे कौतुकाने ते म्हणत आहेत. त्याचे नेत्र मोठे परंतु अर्धोन्मिलित अवस्थेत असल्याने ते अतिशय मादक दिसतात. त्याच मदनाची मोहिनी माता पार्वतीवर पडली आणि तिने त्याला सुमनांच्या माळा अर्पण करून आपलेसे केले. स्मशानात राहणारा हा देव, भस्मविलेपन त्याचा श्रुंगार करून होतो. विभुती लावून तो आणखीनच गौरवर्णी दिसत असला, तरी हलाहल प्यायल्यामुळे त्याचा गळा शितीकंठ म्हणजे मोराच्या कंठासारखा निळा झाल्याचे स्पष्ट दिसून येते. तरी तो उमेला शोभून दिसतो आणि तिचा सांभाळ करतो.
देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजि अवचित हलाहल ते उठले,ते त्वा असूरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले।।
समुद्रमंथनातून निघालेल्या चांगल्या आणि उपयोगी वस्तू देव दानवांनी भांडून पदरात पाडून घेतल्या. परंतु हलाहल निघाले, ते प्यायला कोणी पुढे आले नाही. तू मात्र नि:संकोचपणे हलाहल पचवलेस आणि तेव्हापासून नीलकंठ म्हणून ओळखला जाऊ लागलास.
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी,शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळटिळक रामदासा अंतरी।।
वैरागी वृत्तीचा शिवशंकर व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे परिधान करतो. गळ्यात सर्प गुंडाळतो. मदनावर नियंत्रण मिळवतो. तो आपल्या पाच मुखांनी मुनिजनांकडे कृपादृष्टीने पाहतो. सर्व शक्तिमान असूनही शतकोटीचे बीज ज्या रामनामात आहे, ते सातत्याने घेत त्यातच रममाण होतो. अशा शिवशंकरा तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होतो.