सद्गुरु: ब्रम्हांडाची निर्मिती “जे आहे ते” आणि “जे नाही ते” या दोन्हींयापासून झाली आहे. “ते जे आहे” त्याला एक रूप, आकार, गुण, सौंदर्य आहे. “जे नाही ते” याला यापैकी कोणत्याच गोष्टी नाहीत, पण ते मुक्त आहे. इथे आणि तिथे, “जे नाही ते” “जे आहे” त्यामध्ये फुलते. आणि “जे आहे ते” जसजसे सजग होत जाते, तसतसे त्याला “जे नाही ते” व्हायची ओढ लागते. जरी साकार स्वरुपाचे आपण रूप, गुण आणि सौन्दर्य उपभोगत असू, तरी देखील, आपल्या अस्तित्वाच्या संपूर्ण मुक्त स्वरूपात जाण्याची ओढ अपरिहार्य आणि अटळ आहे. हे फक्त काळ, काळाचे आणि अवकाशाचे बंधन “जे आहे” त्याचा आभास आहे.” “जे नाही ते” त्याला काळ अथवा अवकाशाचे आकलन नाही कारण ते अमर्याद आणि अनंत आहे, काळाच्या आणि अवकाशाच्या मर्यादांच्या बंधनात ते अडकलेले नाही.
जेव्हा अस्तित्वाच्या मूलभूत प्रक्रियेपासून मुक्ती मिळवण्याची ओढ वाढत जाते, तेव्हा मन आणि भावनेचे भीतीदायक स्वरूप त्याकडे फक्त स्वतःचा नाश याच धारणेने पाहू लागते. एका विचारशील मनासाठी, आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे दुसरे तिसरे काही नसून स्वेच्छेने केलेली आत्महत्याच आहे. पण ही आत्महत्या नाही – ते त्याहून अधिक काहीतरी अतिशय वेगळे आहे. आत्महत्या हा स्वतःचे जीवन संपवण्याचा एक अतिशय तुच्छ मार्ग आहे. मी त्याला तुच्छ मार्ग असे म्हणतो कारण तो नेहेमी अपयशी ठरतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण या संस्कृतीत, असे लोक आहेत जे खरोखरच त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने ते करण्यात तज्ञ आहेत – ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे.
“समाधी” हा शब्द सम आणि धी या शब्दांपासून उगम पावला आहे. सम म्हणजे समानता, धी म्हणजे बुद्धी. तुम्ही जर बुद्धीच्या समभाव अवस्थेत पोहोचलात तर त्याला समाधी म्हणून ओळखले जाते. जेव्हा तुमची बुद्धी कार्यरत असते, तेंव्हा तुम्हाला एका गोष्टीची तुलना दुसर्या गोष्टीबरोबर करता येते. म्हणजेच गोष्टींमध्ये भेदाभेद करता येतो. ही एक वस्तु आणि ती आणखी एक वेगळी वस्तु ही तुलना केवळ बुद्धि कार्यरत असल्यानेच शक्य आहे. ज्या क्षणी तुम्ही बुद्धिची ही मर्यादा ओलांडता, तेंव्हा हा भेदाभेद अस्तित्वात राहात नाही. सर्वकाही एकसंध, पूर्णत्व होऊन जाते – जे वास्तविक सत्य आहे. ह्या अवस्थेत काळ आणि अवकाश अस्तित्वात नसतो. एखादी व्यक्ती तीन दिवस समाधीत आहे असे तुम्हाला कदाचित वाटू शकेल, पण त्या व्यक्तीसाठी ते फक्त काही क्षण असतील – ते असेच निघून जातात. त्याने काय आहे आणि काय नाही हे द्वैत पार केलेले असते. त्याने भौतिक मर्यादा पार करून “जे नाही आहे” त्याची चव चाखलेली असते – ते, ज्याला कोणतेही रूप, आकार, गुण, स्वरूप – काहीही नाही.
संपूर्ण अस्तित्व, सृष्टी अनेक, अफाट रुपे केवळ बुद्धी असेपर्यंतच हजर असतात. ज्या क्षणी तुम्ही तुमची बुद्धी विरघळून टाकता, तेव्हा सर्वकाही विरून एक होतं.