अनेकदा राशीभविष्य सांगताना ग्रहस्थितीचे वर्णन केले जाते. जसे की शनिचे स्थित्यंतर अमुक राशीत झाल्यामुळे इतर राशींवर प्रभाव पडेल, सूर्याचे स्थान बदलल्याने अमुक राशींचे भाग्य उजळणार आहे, राहू केतूच्या स्थलांतरामुळे अमुक राशींवर अरिष्ट ओढवण्याचे संकेत आहेत, इ. या गोष्टी आपण वाचतो, पण त्या आपल्या आकलनाच्या पलिकडे असतात. आपण वर दिलेली जुजबी माहिती सोडून राशीभविष्याचा मजकूर वाचून विषय संपवतो. परंतु ही ग्रहस्थिती आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका कसा प्रभाव टाकते, ते थोडक्यात समजून घेऊ.
ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम हे प्रकाशरूपाने होत असतात. जसे सूर्य प्रकाशाचे परिणाम पृथ्वीवर व आपल्यावर होत असतात. वास्तविक ग्रहगोल हे सूर्यापेक्षाही मोठे आहेत, पण ते सूर्यापेक्षा कितीतरी दूर आहेत. त्यामुळे ते आपल्याला लहान दिसतात इतकेच. पण त्यामुळे त्यांचा प्रकाशरूप परिणाम होत नाही, असे नाही.
शिवाय ज्या नक्षत्रात तो ग्रह असतो त्या नक्षत्राचे तेज तो घेतो. ते तेज अधिक आपले तेज मिळून ते पृथ्वीवर परावर्तित करतात. गुरु व शुक्र हे सर्वात दिसावयास मोठे आहेत. तसेच सात्विक, सौम्य व शुभग्रह आहेत. यामुळे त्यांचे इष्ट व शुभ परिणाम प्रकाशरूपाने मानवावर होत असतात.
ही क्रिया त्यांच्या अस्ताच्या कालात थांबते. कारण ते सूर्य सन्निध गेलेले असतात. शुभकार्यात त्यांच्या शुभ व सात्विक परिणामांची गरज असते. पण अस्तामुळे ते मिळणार नाहीत. म्हणून त्यांच्या अस्तात शुभ व मंगल कार्य करू नये, असे शास्त्र सांगते.