काही गणेश मूर्तींची सोंड डावीकडे वळलेली असते, तर काहींची उजवीकडे वळलेली असते. यापैकी उजवी सोंड असलेल्या गणेशाला सिद्धीविनायक असे म्हणतात. याच्या उजव्या व डाव्या बाजूला रिद्धीसिद्धी असतात.
सिद्धीविनायक पापकर्माचे फल त्वरित देतो. म्हणून उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा अवघड असते असे म्हणतात. आपल्या हातून काही चूक झाली, तर सिद्धीविनायकाचा प्रकोप होईल, अशी भाविकांना भीती वाटते. परंतु पूर्वापार चालत आलेल्या उजव्या सोंडेच्या मूर्तीच्या आराधनेमागे असलेली भक्ती बऱ्याचदा प्रेमापोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अनेक अपसमजुती प्रचलित होतात. उदा. कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो, सिद्धिविनायक घरात ठेवू नये, उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो. अशा अनेक अंधश्रद्धा प्रसूत होतात. ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे, तिथे काही वाईट अनुभव आल्याचे ऐकिवात नाहीत. योगायोगाने काही गोष्टी घडल्या, तर तो प्रारब्धाचा भाग असतो, यात उजव्या सोंडेच्या गणपतीला दोष देणे योग्य नाही. ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टींचे श्रेय आपण स्वतःकडे लाटतो, तशीच वाईट गोष्टींची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. याच बऱ्यावाईट घडामोडींना प्रारब्ध म्हणतात.
भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतीत नाही. लेकरांप्रमाणे तो आपला सांभाळ करतो. सद्बुद्धी देतो. त्यात गणपती ही तर बुद्धीची देवता. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील.
सिद्धीविनायकाकडे फक्त मोक्ष मागावा. व्यावहारिक गोष्टींची मागणी त्याच्याजवळ करू नये. व्यावहारिक गोष्टी डाव्या सोंडेच्या गणपतीकडे मागाव्यात असे म्हणतात. व्यवहारातही डावे उजवे असा शब्दप्रयोग वापरतो. डाव्या गोष्टी कमी दर्जाच्या असतात, तर उजव्या गोष्टींचा दर्जा उत्तम असतो. सांसारिक गोष्टी म्हणजे डाव्या गोष्टी व मोक्ष म्हणजे उजवी गोष्ट!
व्यावहारिक, प्रापंचिक सुख द्यायला मंगलमूर्ती सिद्धहस्त आहेच, पण याहीपलिकडे जाऊन मोक्षप्राप्तीची ईच्छा असेल, तर सिद्धीविनायकाला शरण जावे. बाप्पा मोरया!