- विजयराज बोधनकरकृतिकाच्या ‘नर्मदा परिक्रमा’ या विषयावरच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. ती सव्वा वर्षे ही परिक्रमा करून परतली होती. तिच्या तरुण मनाला जाणवलेली परिक्र मा तरुणपिढीला प्रेरक ठरणार होती. परिक्रमेच्या काळातले अनुभव तिने लिहून ठेवले होते. त्याच सोहळ्यात तिची लहान बहीण वनमालासुद्धा आली होती. तिला एका गोष्टीचं राहून राहून शल्य वाटत होतं. कृतिकाने तिलाही या परिक्रमेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं; पण भीती आणि आळस या दोन कारणांमुळे तिने आमंत्रण नाकारलं होतं. जेवणाचं, झोपण्याचं, निवासाचं काय आणि सहा महिने नदीच्या काठाने चालायचं कसं? कृतिका मात्र आई-बाबांच्या किंचित भीतीपोटी होणाऱ्या विरोधाला चोख उत्तर देऊन ती निघाली आणि आज तिला किती मित्रपरिवार मिळाला. नर्मदेच्या काठावरून चालता-चालता युरोप, फ्रान्स आणि आपली माणसं भेटली. कुणी पत्रकार, कुणी लेखक, कुणी खगोलशास्त्रज्ञ अशी बडी मंडळी सतत सहा महिने एकमेकांच्या सहवासात होती. आता तर ते सर्व जणू एका परिवारातले झाले होते. लवकरच कृतिका युरोपच्या आमंत्रणावरून तिकडे जाणार आहे. वनमालेसमोर ही संधी होती. कृतिका सव्वा वर्षात अनुभवाने किती मोठी झाली होती. कृतिकाचे पुस्तक वाचून काढले तेव्हा वनमालेच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. धाडस करून घराबाहेर पडलं की, आयुष्याची समृद्ध उत्तरे मिळतात, याची जाणीव तिला झाली होती. लोक काय म्हणतील याचा विचार न करता घरातून धिटाईने एकटीने परिक्रमेला बाहेर पडलेल्या कृतिकेने परतताना किती मोठं अनुभवविश्व आणि लाखमोलाची माणसं जमविली होती. तिच्या यूट्युब चॅनेलला लाखो फॉलोवर जमले. ती भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतेय आणि मी, असं तिला वाटत होतं. कृतिकाने नव्या पिढीला नकळत संदेश दिला होता की, परंपरेच्या कोंडवाड्यातून मुलींनी, स्त्रियांनी बाहेर पडून स्वत:चं अनुभवविश्व समृद्ध केलंच पाहिजे.
कृतिकेने परतताना किती मोठं अनुभवविश्व आणि लाखमोलाची माणसं जमविली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 3:17 AM