माणसाला आयुष्य जगताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. सुख आणि दुःखाचे चक्र कायम सुरू असते. एखादी व्यक्ती कायम सुखी किंवा कायम दुःखी राहू शकत नाही. यश आणि अपयशाशिवाय सुख आणि दुःखाची किंमत तसेच जाणीव होत नाही, असे सांगितले जाते. मात्र, काही वेळा कितीही संघर्ष, मेहनत केली, परिश्रम घेतले तरी अपेक्षित यश मिळत नाही. नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत राहतात. जवळच्या लोकांशी संबंध बिघडतात. जर कुंडलीत शुभ फलांची संख्या जास्त असेल तर सामान्य परिस्थितीतही जन्मलेली व्यक्ती श्रीमंत, सुखी आणि पराक्रमी बनतो. पण उलटस्थिती बलवान असल्यास व्यक्तीने लाख प्रयत्न केले, तरीही त्याची संकटे कमी होत नाही.
अशावेळी बहुतांश लोकं ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला जातो. कुंडलीत कुठला ग्रह कोणत्या स्थानी आहे. स्थान, स्थानाचे शुभाशुभ परिणाम यांवरून भविष्यातील काही घटना किंवा ग्रहांच्या प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती याचा अंदाज बांधता येतो. अपयश आणि प्रतिकूल परिस्थितीला सातत्याने सामोरे जावे लागत असल्यास कुंडलीत गुरु चांडाळ योग आहे का, ते पाहिले जाते. गुरु चांडाळ योग प्रामुख्याने प्रतिकूल मानला जातो. या योगाबद्दल ऐकून व्यक्तीच्या मनात भीती आणि चिंता निर्माण होते. मात्र, काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्योतिषशास्त्रात याबाबत काही उपाय सांगितले आहेत.
गुरु चांडाळ योग म्हणजे नेमके काय?
एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत एकाच घरात राहु ग्रहासोबत गुरु ग्रह असेल, तर निर्माण होणाऱ्या योगाला गुरु चांडाळ योग असे म्हटले जाते. गुरु हा नवग्रहांचा गुरु मानला जातो. तर राहु हा नवग्रहातील छाया आणि क्रूर ग्रह मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु बलवान असेल, तर या योगाचा अधिक प्रतिकूल प्रभाव दिसून येतो. मात्र, जर गुरु ग्रह बलवान असेल, तर योगाचा फारसा परिणाम दिसून येत नाही. या योगाचा प्रभाव बहुतांश प्रमाणात कमकुवत होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होतो, तेव्हा ती व्यक्ती यशासाठी संघर्ष करत असते. पैशाची कमतरता पदोपदी जाणवते. व्यक्ती निराशा आणि नकारात्मकतेने वेढली जाते. मात्र, यासाठी काही उपायही ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत.
गुरु चांडाळ योग असेल तर कोणते उपाय करावेत?
एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत गुरु चांडाळ योग असेल, तर काही उपाय केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतात. किंवा या योगाचा प्रतिकूल परिणाम कमी होऊ शकतो. उपाय म्हणजे, कपाळावर नियमित केसर, हळदी यांचा तिलक लावावा. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून पिवळ्या वस्तूंचे दान करा. आई-वडील आणि गुरुजनांचा नेहमी आदर करावा. यथाशक्ती, यथासंभव राहु मंत्राचा जप करावा. गुरुवारी भगवान विष्णूंची उपासना करावी. केळीचे रोप लावावे आणि नियमित पूजा करावी, असे काही उपाय उपयुक्त ठरतात, असे सांगितले जाते.