आपण सर्व गुरुभक्त आहोत. त्यामुळे आपल्या हातून गुरुभक्ती अधिक कशी होईल, गुरुभक्तीतील कर्तव्ये अधिकाधिक कशी पार पडतील व आपली गुरुभक्ती अधिकाधिक स्थिर कशी होईल हे जाणले पाहिले.
गुरुभक्तिचा प्रकारु, निरोपावा माते गुरु,जेणे माझे मन स्थिरु, होऊनि राहे तुम्हाजवळी।
एका शिष्याने प्रार्थना केली की, `हे देवा माझ्या अज्ञानामुळे नेमके काय करावे हे मला कळत नसल्यामुळे मी कसे व काय करावे हे मला सांगा' तेव्हा गुरुंनी सांगितले,
गुरुभक्ति म्हणजे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे,कळिकाळाचे नाही भिणे, तया शिष्या परियेसा।
श्रीगुरुंनी शिष्याला असे सांगितल्यावर तो तयार झाला. त्यावेळी शिष्य म्हणाला, `मी कोण गुरुभक्ती करणारा? ती तर तुम्हीच माझ्याकडून करून घ्यावीत! गुरुभक्तीचा प्रकार म्हणजे काय? आम्ही कोणत्या मार्गाने जावे, काय करावे, हे आपण आम्हाला शिकवा, सांगा, म्हणजे आमच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि त्या मार्गाने चालणे सुलभ होईल.
गुरु सांगतात, `मी एक सामान्य मनुष्य आहे. माझ्या अंत:करणात नितांत भक्ती कशी राहील? त्या भक्तीद्वारे मी परमेश्वराला वश कसा करून घेईन? गुरुभक्ती म्हणजे काय करावे? मी जर ते करत असलो तर त्याचे फळ काय? या गोष्टींचा विचार न करता परमेश्वराच्या चरणांजवळ आपले अंत:करण स्थिर असायला हवे. ते स्थिर असणे गरजेचे आहे. आपले मन गुरुचरणांजवळ ज्यावेळेस स्थिर होते तेव्हाच आपला भाव दृढ झाला असे समजावे, तोवर आपण प्रयत्न करीत राहावे.
आपला भाव दृढ व्हायलासुद्धा आपली स्वत:ची योग्यता वाढवावी लागते. ही योग्यता वाढली की नाही हे पाहण्याचे मुख्य लक्षण म्हणजे आपले मन आपल्या गुरुचरणांजवळ स्थिर होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुभक्तीचा प्रकार म्हणजे काय, की ज्या गुरुने केलेले मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आचरण करणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि अपले गुरु ही शक्ती आहे, असे समजून प्रत्येक कार्य आत्मविश्वासाने करणे याला गुरुभक्ती म्हणतात.