भगवान बुद्ध यांनी आपल्या शिष्यपरिवाराला एक नियम आखून दिला होता. तो म्हणजे एका गावी जास्तीत जास्त तीन दिवस मुक्काम करण्याचा! तोही राजेशाही थाटात नाही, तर एखाद्या साध्या झोपडीवजा घरात! घर मिळाले नाही, तर झाडाच्या सावलीत आश्रयाला राहायचे आणि चौथ्या दिवशी एका गावातला मुक्काम हालवून पुढच्या गावी जायचे.
सन्यस्त जीवन जगताना ऐहिक सुखाची ओढ लागू नये, सवय लागू नये, यासाठी तो नियम होता. त्या नियमानुसार लोककार्यार्थ फिरस्तीवर गेलेल्या एका शिष्याला त्या गावातल्या गणिकेने तिच्या घरी तीन दिवस मुक्काम करण्याची विनंती केली. शिष्याने नम्रपणे तिला सांगितले, 'तसे करण्याआधी मला भगवान बुद्धांची आज्ञा मिळवायला हवी.' गणिका म्हणाली, 'ते तुम्हाला माझ्याकडे मुक्काम करण्यास नकार देतील का?'शिष्य म्हणाला, 'नाही, त्यांचा विरोध नसेल, पण तसे विचारणे माझे कर्तव्य आहे.'
शिष्याने आपल्या सहकाऱ्याच्या हाती निरोप पाठवून भगवान बुद्धांचे उत्तर विचारले. आपला सहाध्यायी एका गणिकेच्या घरी थांबणार, तेही तीन दिवस, या विचाराने बाकी शिष्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. भगवान बुद्ध शांत होते. त्यांनी होकार कळवळा. शिष्यांमध्ये आणखीनच बैचेनी वाढली. काही जणांनी त्या शिष्यावर पाळत ठेवायलाही सुरुवात केली.
भगवान बुद्ध यांची परवानगी मिळाल्यावर शिष्य त्या गणिकेबरोबर राहू लागला. तो तिथे तीन दिवस राहणार होता. पहिल्या दिवशी त्या घरातून त्या दोघांच्या एकत्र गाण्याचे आवाज येऊ लागले. शिष्य आश्चर्य चकित झाले. त्यांनी भगवान बुद्धांना हकीकत सांगितली. भगवन शांत होते.
दुसऱ्या दिवशी त्या घरातून दोघांच्या एकत्र नाचण्याचे आवाज येत होते. शिष्यांनी पुन्हा भगवान बुद्धांना वार्ता दिली. आश्रमात सगळेच जण अस्वस्थ होते. तिसऱ्या दिवशी त्या घरातून त्या दोघांच्या एकत्र नाचण्या गाण्याचे आवाज येऊ लागले. तेव्हा शिष्यांची खात्री पटली, गणिकेकडे गेलेला शिष्य आता काही सन्यस्त जीवनात परत येत नाही.
तरीदेखील सर्वांना उत्सुकता होती चौथ्या दिवसाची. त्या दिवशी नियमानुसार शिष्य गणिकेकडचा मुक्काम हलवून आश्रमात परत आला. परंतु आश्चर्याची बाब अशी, की त्याच्या बरोबर एक साध्वी होती. ही तीच सुंदर गणिका होती, जी साध्वी वेशात भगवान बुद्धांना शरण आली होती.
भगवान बुद्धांनी तिचे स्वागत केले आणि तिचा भूतकाळ विसरून तिला नवीन आयुष्याची वाट दाखवली. त्याचवेळेस तिच्यात परिवर्तन घडवणाऱ्या शिष्याचे अभिनंदन करत म्हटले, 'तू खऱ्या अर्थाने सन्यस्त जीवन जगायला शिकला आहेस. खरा योगी तोच असतो, जो इतरांच्या सहवासात येऊन बिघडत नाही, तर बिघडलेल्या लोकांना आपल्या सहवासाने सुधारतो.'
म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका. तुमच्या संस्कारांचा पाया भक्कम असेल, तर तो कोणीच हलवू शकणार नाही. यासाठी तुमची तत्त्व अढळ हवी. तरच तुमच्या सहवासाने दुसऱ्याचा उत्कर्ष होऊ शकतो.