दिवाळीत आपण रोषणाई करताना जराही हात आखडता घेत नाही. कारण, हा सणच दीपोत्सव म्हणून ओळखला जातो. मात्र, ही रोषणाई करताना काही शास्त्रीय संकेत, लोकसमजूती प्रचलित आहेत. त्यांचा मागोवा घेऊया.
देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप याव्यतिरिक्त अन्य कोणतेही ज्वलनद्रव वापरू नये, असे अग्नीपुराणातील आदिकल्प पुराणात सांगितले आहे. देवघरात जी समई असते, ती देवतास्वरूप आहे, म्हणून नित्यनेमाने पूजारंभी व दीपोत्सवाच्या वेळी तिची पूजा करण्याचा कुळाचार आहे.
Diwali 2021 : नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही; जाणून घ्या दीपदानाचे महत्त्व!
दीपावली हा दिव्यांनी रोषणाई करण्याचा सण. त्यात आता लायटींगची भर पडली आहे. तरीदेखील पणती, दिवे, आकाशकंदील यांचे स्थान टिकून आहे. कारण ते दिवाळीची शोभा नव्हे तर उत्सवमूर्ती आहेत. दिवाळीत कितीही रोषणाई केली तरी कंदील हवाच. तोही स्वहस्ते बनवलेला असेल तर आनंदी आनंदच! तो खिडकीत, दारात किंवा अंगणात उंचावर लावला जातो. पूर्वी विद्युत सुविधा नसताना हा उंचावर टांगलेला कंदीलही रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाटसरूंसाठी मनुष्यवस्तीची निषाणी असे. पुढे विद्युतनिर्मिती झाली आणि कंदीलाची ओळक दिवाळीपुरती मर्यादित राहिली. तरीदेखील दिवाळीत त्याचे महत्त्व अद्वितीय आहेच!
आपला कंदील उंचावर लावावा आणि तो सर्वांनी पहावा, हा आपला उद्देश असतोच. परंतु, अशीही एक लोकसमजूत आहे, की, दीपावलीच्या वेळी आकाशात झेप घेऊन उंच लटकणारा आकाशकंदील पितरांना प्रकाश देतो. तसेही धनत्रयोदशीच्या सायंकाळी दक्षिण दिशेला आपण दीवा लावतो. तोदेखील पितरांच्या सद्गतीचा मार्ग उजळून निघावा म्हणूनच! त्यामुळे ही समजूत त्यालाच पुरक असू शकते!
या व्यतिरिक्त दिवाळीत दिव्यांना विशेष महत्त्व असते. दिवा आपण प्रत्येक शुभकार्यात वापरतोच! लग्नकार्यात रोवळीत एक लामणदिवा ठेवतात. त्याला शकुनदिवा म्हणतात. देवपूजेच्या वेळी किंवा कोणत्याही मांगलिक कार्यात साक्षी म्हणून एक दिवा अखंडपणे तेवत ठेवलेला असतो. जसा की आपण नवरात्रीत ठेवतो. त्याला नंदादीप म्हणतात. दिवाळीत घर, अंगण, उंबरठा नव्हे तर सबंध परिसर छोट्या, मोठ्या दिव्यांनी लखाकून निघतो. अशा दीपदर्शनाने जीवनात मांगल्य निर्माण होऊन मन उजळून जाते. व तेच मांगल्या पुढील वर्षभर मनात तेवत राहते...!