एक हिऱ्याचे व्यापारी होते. त्यांना एका मोठ्या व्यवहारासाठी परदेशात जायचे होते. त्याकाळात समुद्रमार्गे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. व्यापाऱ्याने जहाजाचे तिकीट काढले आणि प्रवासासाठी जहाजात आसनस्थ होऊन बसला.
एका चोराने व्यापाऱ्याला हेरले आणि तो त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. त्याचाही प्रवास सुरू झाला. ते हिरे मिळाले, तर आपले आयुष्य मार्गी लागेल या विचाराने तोही जहाजाबरोबर स्वप्नांवर स्वार झाला होता.
त्याने व्यापाऱ्याशी निमित्त काढून ओळख केली. गप्पा सुरू केल्या. त्याचा विश्वास संपादित केला. व्यापारी त्या चोरापेक्षा हुशार आणि सावध होता. त्याला आपल्या जीवापेक्षा हिरे जपणे जास्त गरजेचे होते. तो चोराचे मनसुबे ओळखून होता. रात्र झाली, तशी व्यापाऱ्याला झोप येऊ लागली, परंतु चोर याच क्षणाची वाट बघत होता.
रात्रभरात त्याने शक्य तेवढ्या सगळ्या जागा शोधल्या पण त्याला हिरे मिळाले नाहीत. जहाज परदेशी पोहोचायला अजून एक दिवस लागणार होता. त्या दिवसभरात चोराने पुन्हा बारकाईने लक्ष ठेवले. व्यापाऱ्याच्या हाती हिऱ्यांची पुडीसुद्धा पाहिली. मात्र रात्र होताच ती थैली कुठे गायब होते, याचा त्याला पत्ता लागेना. त्याने रात्री पुन्हा सर्व शक्यता तपासून पाहिल्या आणि हिऱ्यांच्या थैलीचा शोध घेतला, पण हिरे सापडले नाहीत.
तिसNया दिवशी प्रवास संपल्यावर व्यापाऱ्याने चोराला मुद्दामून निरोप घेत पुन्हा भेटू असे म्हटले. तेव्हा चोर शरणागती पत्करून म्हणाला, `मी माझा गुन्हा कबुल करतो, की मी चोरीचा प्रयत्न केला. तो तुम्हालाही लक्षात आला. आजवर माझा अंदाज कधीच चुकला नाही, पण पहिल्यांदा मला अद्दल घडवणारा कोणी भेटला. कृपया मला सांगा, रात्र होताच तुम्ही हिऱ्यांची थैली कुठे लपवलीत?'
व्यापाऱ्याने उत्तर देताच चोराच्या डोळ्यापुढे दिवसा तारे चमकले. व्यापारी म्हणाला, `तू माझ्या हिऱ्यांवर नजर ठेवून होतास हे मला कळले होते, तू त्याचा शोध घेणार हे देखील मला माहित होते, म्हणून मी रात्र होताच तुझ्या कोटाच्या खिशात हिऱ्यांची थैली लपवून निवांत झोपी जात होतो व पहाटे तू थकून झोपलास की ती थैली परत घेत होतो.'
अशीच हिऱ्यांची थैली तुमच्या आमच्या कोटात, पोटात नाहीतर बोटांत दडलेली आहे. फक्त आपण ती बाहेर शोधत फिरतो. मात्र देवाने ती आपल्याचकडे दिली आहे हे विसरतो. त्या चमचमणाऱ्या हिऱ्यांचा अर्थात कलागुणांचा शोध लागला, तर आपले नशीब, भाग्य चमचमायला फारसा वेळ लागणार नाही!