एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावातून जात होते. तिथून जाताना त्यांना एक गरीब माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाने त्याला आपल्या जवळची सोन्याच्या मोहरांची थैली दिली आणि परत भीक मागू नकोस असे सांगितले. थैलीभर मोहोरांमुळे त्याचे आयुष्य नक्कीच सावरणार होते. तो आनंदात घरी निघाला. मात्र एका चोराने ते पाहिले आणि त्याचा पाठलाग करत मोहरांची थैली लंपास केली.
गरीब माणूस स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला. पोटापाण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो परत भीक मागू लागला. अर्जुनाने विचारले, काल तर तुला मोठी भिक्षा दिली, तरी तू आज परत भीक मागतोयेस? त्याने आपबिती सांगितली. अर्जुनाला वाईट वाटले. त्याने आपल्या जवळचा बहुमूल्य मोती त्याला भेट दिला. तो आनंदात मोती घरी घेऊन आला. पण घरात अठरा विश्व दारिद्रय असल्याने तो मोती ठेवावा कुठे असा त्याला प्रश्न पडला. एका मडक्यात त्याने तो मोती ठेवला आणि तो निवांत झोपला. बायको घरी आली, तिने नवऱ्याला अनेक दिवसानंतर एवढं शांत झोपताना पाहिलं. आवाज न करता ती गाडगी मडकी घेऊन नदीवर पाणी भरायला गेली. परत येऊन पाहते तर नवरा शोधाशोध करत होता. तिच्या हातात ते मडकं पाहून म्हणाला, 'हे तू काय केल, यात मी बहुमूल्य मोती ठेवला होता. आपले नशीबच खराब! जाऊदे'
असं म्हणत तो माणूस परत भीक मागायला नेहमीच्या ठिकाणी जात होता. अर्जुनाने त्याला पाहिले आणि त्याला राग आला. तो कृष्णाला म्हणाला आता तूच काय ते बघ. कृष्णाने त्याला दोन शिक्के दिले. तो काही न बोलता ते घेऊन निघाला. वाटेत त्याला एक कोळी दिसला. त्याच्याकडे एक मासळी जाळ्यात अडकलेली दिसली. तिची चरफड पाहून त्याला दया आली. त्याने कोळ्याला दोन शिक्के दिले आणि ती मासोळी विकत घेऊन एका कटोरीत घालून घरी घेऊन आला. पाहतो तर काय, मासळी पाण्यात टाकताच तिने गिळलेला मोती बाहेर टाकला. तो मोती पाहून गरीब माणूस 'दिसला दिसला' म्हणत ओरडू लागला. त्याच्या झोपडीबाहेरून जाणाऱ्या भुरट्या चोराला वाटले, सोन्याच्या मोहरांची थैली नेताना कोणी आपल्याला पाहिले. आपल्याला कोणी शिक्षा देण्याआधी इथून निसटून जाणे चांगले. असे म्हणत त्याने मोहरांची थैली गरिबाला सुपूर्द केली. तो तिथून पळून गेला. गरिबाला आश्चर्याचा धक्का बसला. मोती मिळाला आणि थैली पण! दुसऱ्या दिवशी त्याने आठवणीने जाऊन कृष्णाचे आभार मानले. तेव्हा अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने कृष्णाला विचारले, आधी मी त्याला मोहरा दिल्या, मोती दिला, पण त्या गोष्टी त्याला लाभल्या नाहीत, मात्र तू दिलेले दोन शिक्के कसे काय लाभले?
कृष्णाने सांगितलं, 'आधी मिळालेल्या लाभाचा विचार तो स्वतःपुरता करत होता, दोन शिक्के मिळाले तर त्यात त्याने स्वतःचा विचार सोडून दुसऱ्याचा विचार केला. जो दुसऱ्यासाठी झटतो, त्यांचा उत्कर्ष होतो. चांगल्या कामाची पेरणी केली तर मोबदलाही चांगलाच मिळतो. म्हणून चांगले कर्म करत राहा हे मी कर्मयोगात सांगितले आहे.
हीच बाब लक्षात ठेवून आपणही सत्कर्माची कास न सोडता आपले काम करत राहावे, असे श्रीकृष्ण सांगतात.