Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासाठी तयारी सुरू केली असून, ११ दिवसांचे विशेष व्रताचरण सुरू केले आहे. याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली होती. यामध्ये यम नियमांचे पालन केले जाणार आहे.
आध्यात्मिक प्रवासातील काही तपस्वी आणि महापुरुषांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार तसेच त्यांनी सुचविलेल्या यम-नियमांनुसार ११ दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. या पवित्र प्रसंगी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ऋषी, मुनी आणि तपस्वी यांच्या सद्गुणांचे स्मरण करतो. आणि भगवंताचे रूप असलेल्या लोकांकडे प्रार्थना करतो की, मला आशीर्वाद द्यावेत. जेणेकरून मनापासून वचनबद्ध झाल्याने माझ्या कर्माचरणात कोणतीही कमतरता राहू नये, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यात सांगितलेला यम नियम म्हणजे नेमके काय?
‘यम नियम’ म्हणजे काय?
धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणारे तज्ज्ञ पंडित राजकुमार मिश्रा यांच्या मते, केवळ प्राणप्रतिष्ठेपुरते नाही तर कोणत्याही यज्ञ किंवा सोहळ्यास जाण्यापूर्वी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या केंद्रित राहण्यासाठी यम नियमाचे पालन करण्याचे विधान आहे. शास्त्रामध्ये अष्टांग योगाच्या ८ अंगांपैकी प्रथम यम आणि नंतर नियम यांचे स्पष्टीकरण दिले आहे. यमाचे पाच प्रकार आहेत - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. म्हणजेच मन, शब्द आणि कृतीने अहिंसा आणि सत्याचे पालन करा, अस्तेय म्हणजेच चोरीचा त्याग करून ब्रह्मचर्य पाळा. आता पाच नियम असे आहेत की, सर्व प्रथम शुचिता असणे आवश्यक आहे. म्हणजे स्वच्छता, समाधानाची भावना, तपस्या आणि जप म्हणजेच प्रणव मंत्राचा जप-जाप, धार्मिक शास्त्रांचा स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान म्हणजेच पूर्ण श्रद्धा. आत्मसंयमाचे हे टप्पे पार केल्यानंतर, एखादी व्यक्ती शास्त्रोक्तपणे दीक्षा घेण्यास किंवा यजमान बनून यज्ञ किंवा विधी करण्यास पात्र बनते, असे शास्त्र सांगते.
दरम्यान, नाशिक धाम-पंचवटी येथून माझ्या ११ दिवसांच्या व्रताची सुरुवात करत आहे, हे माझे भाग्य आहे. पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीराम बराच काळ वास्तव्यास होते. आणि माझ्यासाठी योगायोग आहे की, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.