भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये भक्तिभावाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कोट्यवधी लोकांच्या घरात दररोज सकाळी देवाची पूजा केली जाते. तसेच सायंकाळी दिवेलागणीच्या वेळेला देवासमोर दिवाही लावला जातो. गणपती बाप्पाचे आगमन, व्रते, विशेष पूजा, होम-हवन, संकल्पपूर्ती यांमधील विधींच्या वेळेला देवाला आरती अर्पण केली जाते. तर दुसरीकडे देशातील हजारो मंदिरात दररोज वेगवेगळ्या वेळी आरत्या केल्या जातात. मुख्य आरती दुपारी आणि सायंकाळी केली जाते. मात्र, आरती करताना काही नियम पाळावे लागतात. याबाबत स्कंध पुराणात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. देवाच्या आरतीचे महत्त्व आणि काही मान्यतांविषयी जाणून घेऊया... (What is the purpose of doing Aarti)
आरती हा एक अतिशय प्राचीन शब्द आहे. आरतीचे महत्त्व स्कंदपुराणात सांगण्यात आले आहे. याचा अर्थ कोणत्याही देवतेची पूजा केल्यानंतर, देवाचे आशीर्वाद लयबद्ध पद्धतीने गाणे, स्तुती करणे आणि देवाचे आभार मानणे. आरतीच्या पद्धतीत निरांजन आणि काही विशेष वस्तू ताटात ठेवून उजव्या हाताला भगवंताच्या समोर फिरवल्या जातात. काही ठिकाणी एकारती, पंचारती याही देवाला दाखवल्या जातात. (Significance of Aarti)
आरतीबाबतचे काही नियम आणि मान्यता
आरतीशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही, असे सांगितले जाते. तसेच षोडशोपचार पूजा, उपासना, मंत्रोच्चार, यानंतर आरती केली जाते. आरती करण्यापूर्वी तबक तयार करावे. यामध्ये आपापले कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे एकारती, पंचारती घ्याव्यात. यासोबतच पूजेची फुले, रोळी, अक्षत, प्रसाद इत्यादी तबकात ठेवावे. आरती चार वेळा परमेश्वराच्या चरणी, दोनदा नाभीत, एकदा चेहऱ्यावर आणि सात वेळा संपूर्ण शरीरावर फिरवावी, असे सांगितले जाते. (Rules of Performing Aarti)
आरतीचे महत्त्व
स्कंद पुराणानुसार भगवान विष्णूने सांगितले की, जो मनुष्य तुपाचा दिवा लावून आरती करतो तो अनेक वर्षे स्वर्गात राहतो. जो मनुष्य माझ्यासमोर आरती होताना पाहतो, त्याला परमधाम प्राप्त होतो. कापूराने आरती केल्यास अनंतात प्रवेश होतो असे वर्णन करण्यात आले असल्याचे सांगितले जाते.