अलीकडे सगळ्याच बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची आपल्याला सवय लागली आहे. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस, तोही पार्टी करत आपण बाहेर घालवतो. पूर्वी घरगुती स्वरूपात आप्त नातलगांबरोबर वाढदिवस साजरा केला जाई. आई, आजी, ताई औक्षण करत असे. त्यांच्याकडून मिळालेले पाच पन्नास रुपये, वडिलांनी दिलेले नवे कपडे, सायकल, खेळणी, पुस्तक हे मोठ्या गिफ्ट पेक्षा बहुमूल्य वाटत असे. सकाळी देव दर्शन, संध्याकाळी गोड धोड जेवणाचा बेत, शाळेत शिक्षकांच्या आणि वर्ग मित्रांच्या शुभेच्छा यामुळे वाढदिवस आनंदात साजरा होत असे. मात्र अलीकडे वाढदिवसाला जे बीभत्स रूप आले आहे. ते पाहता धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम आणि त्यामागची कारणीमिमांसा यांची आठवण करून देणे अपरिहार्य ठरत आहे.
धर्मशास्त्र सांगते :
वाढदिवस हा केवळ गोड धोड खाण्याचा दिवस नाही, तर आयुष्यात एक एक टप्पा पुढे सर करत असताना वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. बालपणी जबाबदाऱ्यांचे भान नसते, परंतु कळत्या वयापासून आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी सिंहावलोकन करून आयुष्याची बेरीज वजाबाकी करणे गरजेचे आहे. यासाठीच बालपणी संस्कार महत्त्वाचे आहेत. ते संस्कार पुढील प्रमाणे-
>>वाढदिवस रात्री साजरा करण्याऐवजी नेहमी सूर्योदयात साजरा करावा. सूर्य नारायण उगवल्यावर सर्व प्रथम लवकर उठून स्नान वगैरे करून सूर्यदेवाला नमस्कार करावा.
>>वाढदिवस तारखेनुसार नाही तर तिथीनुसार साजरा केला पाहिजे. त्या तिथीला वाहणारी ऊर्जा आपल्या शरीरात असलेल्या लहरींशी अगदी जवळून जुळते. म्हणून तिथीला वाढदिवस साजरा करावा. घरातल्या मोठ्यांचे तसेच गुरुजनांचे आशीर्वाद घ्यावेत, देवदर्शन घ्यावे.
>>घरातल्या माता भगिनींनी औक्षण करून दिर्घआयुष्याचा आशीर्वाद द्यावा. आपली संस्कृती दिवा लावायला शिकवते, विझवायला नाही. कारण आपण अग्नी पूजा करतो आणि अग्नी प्रज्वलीत करणे शुभ मानतो.
>>वाढदिवसाच्या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा. धार्मिक तसेच समाज कार्याला आर्थिक हातभार लावावा. अन्नदान करावे.
>>नवे कपडे ही केवळ हौस नाही तर त्यामुळे पुढच्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची ऊर्जा मिळावी असा त्यामागचा संकेत आहे.
>>वाढदिवसाच्या दिवशी सात्विक भोजन करावे आणि उत्तर आयुष्यातही शाकाहार तसेच सात्विक आहाराचा आग्रह धरावा. त्यामुळे आपले विचार सात्विक बनतात.
वाढदिवसाला काय करू नये?
>>वाढदिवसाला रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री १२ वाजता तारीख बदलत असली तरी हिंदू पंचांगानुसार सूर्योदयानंतर नवा दिवस सुरु होतो. म्हणून आपण आपल्याच संस्कृतीचा आग्रह धरला पाहिजे. कारण कोणतेही शुभ कार्य उजेडात करावे, अंधारात नाही, असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे.
>>केक ऐवजी दुसरे एखादे पक्वान्न करावे आणि केक कापणार असल्यास मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करू नये.
>>दिव्याच्या अखंड ज्योतीप्रमाणे आपले आयुष्य उजळून निघावे असे वाटत असेल तर दिवा विझवू नये उलट ज्येष्ठ भगिनींकडून औक्षण करून घ्यावे.
>>एक खास गोष्ट लक्षात ठेवा की वाढदिवसाच्या दिवशी केस कापू नयेत. केस कापणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी हा दिवस त्या कामासाठी निवडू नये.