समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधुनि पाहे...!' या जगात सुखी कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेतच. काही जण समस्येला धैर्याने तोंड देतात, तर काही जण कच खातात. अशा परिस्थितीत कोणाचा निभाव लागतो? हे या बोधकथेतून शिकूया.
एका शाळेतला एक विद्यार्थी अतिशय गरीब असतो. स्वमेहनतीने कमवून, घराचे पालन पोषण करून, शिक्षण घेत असतो. बालवयातच अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्यामुळे तो पोक्त झालेला असतो. या जबाबदाऱ्या, हे प्रश्न, संकटं संपणार आहेत की नाही? मी इतर मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकणार आहे की नाही, अशा विचाराने तो खूप रडतो. कोणाशीतरी मनमोकळेपणाने बोलावे, असे त्याला वाटू लागते.
त्याच्या शाळेत गणिताचे शिक्षक त्याला खूप आवडत. तो एकदा शाळा सुटल्यावर शिक्षकांना भेटला. म्हणाला, `सर, तुमच्याशी थोडं वैयक्तिक बोलायचे आहे.' शिक्षकांनी त्याच्या बोलण्याचा अंदाज घेतला आणि त्याला म्हणाले, माझ्या घरी चल, तिथे निवांत बसून बोलू.
मुलगा शिक्षकांबरोबर घरी गेला. शिक्षकांनी त्याला बोलते केले. तो आपल्या आयुष्यात एकामागोमाग एक आलेल्या संकटांबद्दल, जबाबदाऱ्यांबद्दल सांगू लागला. आपल्याला इतर मुलांसारखे आनंदाने जगता येईल का, असे आशेने विचारत होता.
शिक्षक मध्येच उठले. स्वयंपाकघरात गेले. मुलालाही त्यांनी आत बोलावले. तो बोलत होता. शिक्षकांनी गॅस सुरू करून तीन शेगड्यांवर तीन पातेली ठेवली. मुलाला वाटले, ते आपल्यासाठी काही बनवत आहेत. शिक्षक त्याचे बोलणे ऐकता ऐकता काम करत होते. तीन पातेल्यात सारख्या प्रमाणात पाणी टाकून एकात बटाटा, दुसऱ्यात अंडे आणि तिसऱ्यात कॉफीच्या बिया त्यांनी टाकल्या.
काही वेळाने पाणी उकळू लागले. मुलगा आपल्या समस्येतून काही उत्तर मिळेल का याची वाट बघत होता. शिक्षक गप्प होते. पाणी पूर्ण उकळल्यावर त्यांनी तिनही गॅस बंद केले आणि तिन्ही गोष्टी ताटात काढल्या. त्यांनी मुलाला त्या वस्तूंना स्पर्श करायला सांगितला. म्हणाले, `तुला काय जाणवते का सांग? यातच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे.'
मुलगा चक्रावला. त्याने हात लावून पाहिले. पण उत्तर त्याला कळेना. त्याने शिक्षकांना उत्तराची उकल करायला सांगितले.
शिक्षक हसून म्हणाले, `बाळा, या तीनही पातेल्यात समान तपमानात पाणी उकळत होते. परंतु त्यात तीन पदार्थ वेगळे होते. त्या तिघांनी आपल्या क्षमतेनुसार प्रतिसाद दिला आणि त्यांच्याशी काय घडले, ते तुझ्यासमोर आहे. बटाटा उकडल्यामुळे मऊ पडला, अंडे कडक झाले, कॉफीच्या बियांचा सुगंध दरवळू लागला.
त्याचप्रमाणे बाकीच्या मुलांच्या आयुष्याशी तू तुलना करू नकोस. तुझ्या मेहनतीचा दरवळ या कॉफीच्या बियांसारखा दुसऱ्यांना आनंद देणारा आहे. एवढ्या कठीण काळात स्वत: वितळून दुसऱ्यांना सुगंध देण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते, ती तुझ्यात आहे. दु:खाचे, कष्टाचे दिवस आज ना उद्या संपतील, पण तुझ्या स्वभावाचा दरवळ तू कायम ठेव.