आपण जे भोग भोगतो, ते आपल्या कर्माचे प्रारब्ध असतात. आपण चांगल्या गोष्टी उपभोगून मोकळे होतो. परंतु वाईट गोष्टी आयुष्यात घडू लागल्या की देवाला डागण्या द्यायला सुरुवात करतो. याबाबत तुकाराम महाराज म्हणतात...
बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, आम्ही अविश्वासी सर्वभावे।दंभे करू भक्ती सोंग दावू जना, अंतरी भावना वेगळिया।चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे।तुका म्हणे देवा तू काय करिसी, कर्मा दुस्तरासी आमुचिया।।
देवाने आपल्याला किती किती चांगल्या गोष्टींचे दान दिलेले आहे याचा विचार आपण करीत नाही. जरा कुठे बिनसले, एखाद्या कामात यश नाही आले, एखादे दुखणे आले, संकट आले, की `देवा माझ्यावर का रे असा प्रसंग आणलास?' म्हणून त्याला आपण दोष देतो. पण आपण हे ओळखत नाही की
नादत्ते कस्यचित्त पापं न चैव सुकृतं विभु:। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव:।
देव कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही, जो तो निजकर्माचा भोग भोगतो. ज्ञानावर अज्ञानाचे आवरण पडलेले असते. त्यामुळे प्राणिमात्र कर्तेपणा स्वत:कडे घेऊन मोहमूढ होतात. परमेश्वराच्या औदार्याला सीमा नाही. आपली श्रद्धाच कमी पडते. जे घडते ते पूर्णपणे आपल्या पारमार्थिक हिताचेच असते. कधीकधी दु:खानेच माणूस जास्त शहाणा होतो. ते शिकवते. कार्य करण्यास प्रवृत्त करते. आपल्या चित्ताचा देव साक्षी असतो. भक्तीचे सोंग लोकांपुढे एखाद्याने आणले तरी आतून देहबुद्धी गेलेली नसते.
शरीर सुखासाठी, मन कीर्तीसाठी, भावना जिव्हाळ्यासाठी आसुसलेल्या असतात. देव ते जाणतो. परिपूर्ण श्रद्धेचे फळ त्या भक्ताला मिळत नाही. मी मोठा भक्त आहे, मी पुण्यकृत्येच करतो. असा आव आणला तरी देव फसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आमचे कर्मच दुर्धर आहे की तू आम्हाला सोडवूच शकत नाहीस. आम्हाला सुद्धा खरी मुक्ती नकोच असते. काहीही करून स्वार्थच साधायचा असतो. त्याला तू काय करणार?