लहान मुलांची एक गंमत माहितीये का? ते जेव्हा पडतात, तेव्हा ते सभोवताली बघतात, कोणी त्यांना पडताना पाहिले, तर रडारड करतात नाहीतर आपण आपले उठून खेळायला लागतात. मोठ्या माणसांच्या बाबतीतही तेच घडते. दुःख सहन करण्याची क्षमता प्रत्येकात असते, पण कोणी सांत्वन करू लागले की आपण जास्तच रडू लागतो. म्हणून भावनिक प्रसंगी कमकुवत न होता, काहीही न झाल्यासारखे उठा आणि सज्ज व्हा. अगदी या कथेतल्या राजासारखे!
दोन देशांमध्ये युद्ध छेडले गेले होते. चहू बाजूंनी आक्रमण होत होते. प्रजेला नुकसान नको, म्हणून अपयशी होत चाललेला राजा आपल्या सैन्याला घेऊन शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्याच्या सीमाभागात जाण्याची तयारी करू लागला. शत्रू बेसावध असताना राजा आणि सैन्याने एका भल्या मोठ्या जहाजातुन समुद्र मार्गे शत्रू देशात प्रवेश केला. शत्रूच्या सैन्याच्या तुलनेत राजाकडचे सैन्य कमी होते. सगळे जण शत्रूच्या सीमाभागात सुखरुप आल्यावर राजाने ते जहाज जाळून टाकायला सांगितले. सैनिकांना प्रश्न पडला. उद्या पूर्ण पराभव झाला, तर तो परतीचा एकमेव मार्ग होता. परंतु राजाची आज्ञा होती.
जहाज जाळून टाकण्यात आले. भल्या पहाटेची वेळ होती. शत्रू झोपेत होता. त्यावेळेस राजाने आपल्या सैन्याला गोळा केले व सांगितले, शत्रूच्या तुलनेत आपली सैन्यसंख्या कमी आहे, परंतु आपले सैन्य त्यांच्या सैन्याच्या तुलनेत कणभर सरस आहे. आता आपले परतीचे मार्ग संपलेले आहेत, नव्हे मी ते मुद्दाम संपवले आहेत. आता 'जिंकू किंवा मरू' एवढाच आपल्यासमोर पर्याय आहे. तुम्ही लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माझ्यासोबत आहात?'
सर्व सैन्याचे बाहू स्फुरण पावले आणि सर्वांनी एका ताकदीने, एका सुराने हो म्हटले आणि घनघोर युद्ध झाले. जिवाच्या आकांताने लढणाऱ्या सैनिकांनी शत्रूचा धुव्वा उडवला आणि विजयश्री मिळवली. नवीन देशावर आपला ध्वज फडकावून सगळे सन्मानाने मायदेशी परतले.
तात्पर्य हेच, की कधी कधी आपल्यालाही आशेचे, परावलंबित्त्वाचे दोर तोडावे लागतात. स्वावलंबी होऊन दिलेला लढा जिंकण्याची जिद्द निर्माण करतो. हे युद्ध आपण रोजच लढतो. फक्त त्यात अभाव असतो स्वावलंबित्वाचा आणि जिद्दीचा!