आपल्या सर्वांचा लाडका गायक केके याचे काल वयाच्या ५३ व्या वर्षी अकाली निधन झाले. त्यावेळी त्याच्या चाहत्यांची पहिली प्रतिक्रिया होती, 'हे काही त्याचं जाण्याचं वय नव्हतं!'
तो गेला याचे वाईट वाटले, पण त्याला जोडूनच अनेकांच्या मनात नेहमीचा प्रश्नही आला, की एवढी वाईट माणसं जगात असताना देवाला चांगलीच माणसं का न्यावीशी वाटतात? यावर जुने जाणकार सांगतात, 'देवालाही आपल्यासारखीच चांगल्या माणसांची गरज असते म्हणून!' वस्तुतः ही सबब आपल्या मनाला पटत नाही आणि आपण आपल्या मनाच्या पातळीवर देवाशी शीतयुद्ध पुकारतो आणि त्याला जाब विचारतो... तू असं का केलंस?
या मोहमायेत, संसारात अडकलेले आपण सामान्य जीव, या अवघड प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळणे कठीण. त्यामुळे आपण तात्पुरता शोक व्यक्त करतो आणि पुन्हा आपापल्या संसारात गुरफटून जातो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे!' अर्थात आज दुसऱ्याच्या जाण्याचा शोक करणारा मनुष्य स्वतः अकस्मात कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही. या गोष्टी समजत असल्या तरी मनात प्रश्न उरतोच, 'चांगल्या व्यक्तीच का?' यावर श्रीकृष्णाची एक गोष्ट आठवते. तिचा अन्वयार्थ लावून या प्रश्नाची उकल शोधण्याचा प्रयत्न करू.
एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन एका जंगलातून जात होते. त्या जंगलात हिंस्त्र श्वापदे होती. नावालाही मनुष्य प्राणी नाही. अशा जागी गेल्यावर अर्जुनाने विचारलं, 'कृष्णा या निबिड अरण्यात मला का घेऊन आलास?' कृष्ण म्हणाले सांगतो...! दोघेही पायी पायी जंगलातून चालत होते. पाचोळा पायाखाली चुरडला जात होता. त्या घनघोर अरण्यात वृक्षांच्या दाटीमुळे सूर्यप्रकाश आत शिरायला वाव नव्हता. त्यामुळे दिवसा काळोख होता. चालता चालता ते अरण्याच्या शेवटाकडे पोहोचले. तिथून पुढे स्वच्छ प्रकाशात पलीकडचा निसर्ग दिसत होता. काही कोसावर मानवी वस्तीदेखील दिसत होती. त्याच ठिकाणी एक झोपडी दिसली. कृष्ण म्हणाले, या झोपडीत जाण्यासाठी तुला सोबत घेऊन आलो आहे. जा, झोपडीचे दार ठोठव. अर्जुनाने तसे केले. एक आजीबाई झोपडीतून बाहेर आली. कृष्ण दर्शनाने आजी मोहरून गेली. म्हणाली, 'कृष्णा तुझ्या दर्शनासाठीच तग धरून होते. आता मी मरायला मोकळी.'
आजीबाईंचा वनवासी पाहुणचार घेत अर्जुन म्हणाला, 'आजी तुम्ही एकट्याच राहता? मग उदरनिर्वाह कशावर करता?''झोपडीच्या पाठीमागे एक गाय आहे. तिचे दूध विकायला पलीकडच्या गावात जाते आणि त्यातून मिळणाऱ्या धान्यावर जगते आणि तिलाही जगवते.' आजी कृतार्थतेने सांगत होती.
'पण या निबीड अरण्याजवळ राहताना भीती नाही वाटली?' अर्जुनाने आणखी एक प्रश्न विचारला. आजीबाई म्हणाली, 'नाही वाटली, कृष्णाचं नाव घेत जगत होते. तो तर गोपाळ आहे. तो असताना मला आणि माझ्या गायीला कशाची भीती असणार आहे? माझी गाय माझे सर्वस्व आहे. तिच्याच जीवावर आणि कृष्णाच्या भरवशावर जगत आहे.'
एवढं बोलून झाल्यावर कृष्णाने आजीबाईंना आशीर्वाद दिला आणि अर्जुनासह ते झोपडीतून बाहेर पडले. आजी झोपडीत होती. कृष्णाने बाहेर पडताच म्यानेतून तलवार काढत गायीला ठार केले. अर्जुन बघतच राहिला. म्हणाला, 'कृष्णा हे काय केलंस? आजीबाईंच्या जगण्याचं साधनच हिरावून घेतलंस?'श्रीकृष्ण म्हणाले, 'अर्जुना आजीचा सगळा जीव गायीत अडकला होता आणि गायीचा आजीत. मी आजीचा जीव काढून घेतला आणि तिचा मोह मायेचा मार्ग मोकळा केला. माझे भक्त आज ना उद्या माझ्याकडे यायचेच आहेत. त्यांना या क्लेशदायी जगात त्रास होऊ नये म्हणून मी त्यांचा कार्यकाल पूर्ण होताच तडक माझ्याकडे बोलावून घेतो! आजीचे व गायीचे कार्य पूर्ण झाले होते, म्हणून स्वहस्ते त्यांना मी परमधामाचा मार्ग दाखवला!
या कथेचा अन्वयार्थ काढायचा तर असे लक्षात येईल की, चांगल्या व्यक्ती तडकाफडकी निघून जातात आणि दुष्ट, खाष्ट, वाईट वृत्तीची माणसं दीर्घकाळ आपले भोग भोगत राहतात!