काही वेळा नवीन घर बांधून तयार होते. पण पुढे दोन चार महिने वास्तुशांतीसाठी मुहूर्त नसतात. शहरात जागेची अडचण असते. अनेकांना जागा सोडण्याबाबत घरमालकांचा तगादा असतो, तर काहीजण स्वत:च्या घरात राहण्यास उत्सुक असतात. कारणेही अनेक असतात. पण वास्तुशांतीसाठी मुहूर्तच नसतो. अशावेळी शास्त्राने कोणता पर्याय दिला आहे, ते पाहू.
वास्तुशांति केल्याखेरीज नव्या घरात राहायला जाऊ नये असे नाही. म्हणून अशा अडचणीचे वेळी गृहशुद्धीकरता व शुभता येण्यासाठी उदकशांती अथवा ग्रहयज्ञ करून राहण्यास जावे. तत्पूर्वी ज्योतिषांकडून योग्य दिवस विचारून घेऊन त्यादिवशी हळदकुंकू, पाण्याने भरलेला तांब्या, थोडे, तांदूळ, हार, पेढे, देवाचा फोटो पती-पत्नीने नवीन घरात नेऊन ठेवावा.देवाच्या फोटोला हार घालून, पेढ्याचा नैवेद्य दाखवून वास्तूला नमस्कार करावा. नंतर दोघांनी पेढा खाऊन पाणी प्यावे. त्यानंतरच बाकीचे सामान नवीन घरात न्यावे.
वरील धार्मिक कृत्य करून त्या दिवशी राहायला जावे व पुढे जेव्हा वास्तुशांतीचा मुहूर्त असेल, त्या दिवशी वास्तुशांति करावी. घरातील सर्व मंडळींसह मंगलकलश, दीप व देव घेऊन ब्राह्मणांनी मंत्रपठण करत गृहप्रवेश करावा. हे केल्यामुळे वास्तु लाभते. वास्तु शांत व सुखदायक होतो. घरात वास्तुपुरुषाचा निवास असल्यामुळे आपलेही आयुष्य सुखात व्यतित होते.