आपण रोज सकाळी उठतो, ते फक्त जाग येते म्हणून का? तसे असेल तर आपण उठलो काय नि झोपलो काय, आपल्या अस्तित्त्वाने काहीच फरक पडणार नाही. परंतु, आपण जर एखादा संकल्प मनाशी ठरवून उठलो, तर त्याचा स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यावर नक्कीच फरक पडेल.
रात्री अलार्म सेट करताना उद्याच्या दिवसभराच्या कामाची यादी आपल्या डोक्यात असते. म्हणजेच, उद्यापुरते ध्येय आपल्या डोक्यात पक्के असते. मात्र, तेही डोक्यात नसेल, तर? अशा ध्येयविरहित जिवनाला मार्मिक लेखक व.पु.काळे पत्त्याशिवाय पाठवलेले पत्र म्हणतात. पत्रावर कितीही चांगला मजकूर लिहिला, किंवा आताच्या काळात ईमेलवर कितीही मायना टाईप केला, परंतु, तो कुठे पाठवायचा आहे, हेच माहित नसेल, तर त्याची ड्राफ्ट होते. तो मजकूर अडगळीत पडून राहतो.
प्रभातफेरी करायला निघाल्यावर कुठपर्यंत जाऊन परतायचे, याचा आराखडा डोक्यात असतो. तोच जर डोक्यात नसेल, तर कुठे जायचे, कुठे परत यायचे हे ठाऊक नसलेली व्यक्ती घरी परत येईल का? एखाद्या ट्रेनमध्ये आपण बसलो, पण कोणत्या स्टेशनला उतरायचे, तिथे कशासाठी जायचे, हेच माहित नसेल, तर त्या प्रवासाला अर्थ उरेल का? हे म्हणजे वाऱ्याबरोदबर उडणाऱ्या पाचोळ्यासारखे झाले. पाचोळ्याला स्वत:ची दिशा नसते, तो वाऱ्याच्या दिशेबरोबर पुढे सरकत राहतो. परंतु, मनुष्य जीवन हे पाचोळा नाही. त्याची किंमत जाणून घेतली पाहिजे.
आपण रोज झोपून उठतो, ही ईश्वराची दया आहे. काल राहिलेले काम, आजवर पाहिलेली स्वप्न, अपूर्ण राहिलेले ध्येय पूर्ण करण्याची नवीन संधी. म्हणून यशस्वी लोक नवीन संकल्पांसाठी नवीन वर्षाची वाट पाहत नाहीत, तर ३६५ दिवस ही नवीन वर्षाची, नवीन आयुष्याची, नवीन ध्येयाची संधीच आहे असे समजतात.
आपल्याकडून भगवंताला काहीतरी चांगले काम करवून घ्यायचे आहे, म्हणून आजचा दिवस मला बघता आला, हे वारंवार मनावर बिंबवले पाहिजे. जगातील कोणतीही व्यक्ती उद्याचा दिवस मी बघू शकेनच, अशी ग्वाही देऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक दिवस शेवटचा, असे मानून त्या दिवसाचे सोने केले पाहिजे. याबाबतीत, एव्हरेस्ट सर करणारी, अरुणिमा सिन्हा हिचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.
उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला ट्रेनमधून बाहेर फेकले. तीच्या पायावरून ट्रेन गेली, रात्रभर ती रेल्वेपटरीवर विव्हळत होती. दुसऱ्या दिवशी तिला जाग आली, ते थेट इस्पितळात. त्या अपघातात तिने एक पाय गमावला होता. मूळातच खेळाडू असलेली अरुणिमा, तिने आयुष्यातील या गंभीर प्रसंगाकडेही खिलाडू वृत्तीने पाहिले आणि नियतिला दोष न देता, तिने आपल्याला जगवले, त्याअर्थी काहीतरी असामान्य कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी दिली आहे, असे म्हणत जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा निर्णय घेतला. हे शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बचेंद्री पाल यांची तिने भेट घेतली आणि अथक मेहनत करून तिने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एव्हरेस्ट सर केला.
अशी अनेक उदाहरणे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी बळ देत असतात. त्यांच्याकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे. आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे. आपण आपल्या क्षेत्रातला एव्हरेस्ट सर केला पाहिजे. तो एव्हरेस्ट कोणता, हे माहित नसेल, तर दिवशी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे,
मी कोण कोठून कशास्तव येथ आलो?ही इंद्रिये घेऊनि कशास्तव सज्ज झालो?कर्तव्य काय मज येथ करावयाचे?मेल्यावरी मज कुठे जावयाचे?
या प्रश्नांनी स्वत:ला सतत जागृत ठेवले पाहिजे. तरच, एक ना एक दिवस आपणही आयुष्याचा एव्हरेस्ट नक्की गाठू.