मृत्यूनंतर माणसाचा आत्मा कुठे जातो, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहतो. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते. त्याचा पुढचा प्रवास कसा व कुठल्या दिशेने होतो याचे वर्णन शास्त्रात केले आहे. आज आपण मृत्यूनंतरचे रहस्य जाणून घेणार आहोत.
मृत्यू आणि त्यानंतरचा प्रवास याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असते. धर्मग्रंथांमध्ये आत्म्याचे रहस्य वर्णन केले आहे. ऋषी-महर्षींनी आपल्या योगसामर्थ्याने संपूर्ण विश्वाचे निरीक्षण करून मानवाच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी धर्मग्रंथांची रचना केली आहे. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, आत्मा कुठे जातो, पुढे जग कसे आहे, हे विज्ञानाच्या दृष्टीने अजूनही एक गूढच आहे, कारण एकदा का शरीर सोडले की आत्मा त्या शरीरात परत येणे अवघड आहे, हे अशक्य आहे, म्हणून आत्म्याविषयीचा एकमेव पुरावा म्हणजे ब्रह्मज्ञान होय. परमयोगी श्री आदिशंकराचार्य यांचा परकाय-प्रवेश सर्वश्रुत आहे.
जेव्हा माणूस या जगात येतो तेव्हा त्याचे शरीर त्याच्या सोबत असते, परंतु जेव्हा तो जातो तेव्हा तो ते देखील मागे सोडतो. मानवी शरीर हे नश्वर आहे, जो जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस आपल्या प्राणाची आहुती द्यावीच लागते, मनुष्य किंवा इतर प्राणी जरी शंभर वर्षे किंवा त्याहून अधिक जगले तरी शेवटी त्याला आपले शरीर सोडावेच लागते. आणि देवाकडे परत जावे लागते. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की, मृत्यूनंतर आत्मा काय करेल, कुठे जाईल? जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात माणूस अनेकवेळा जन्म घेतो पण आपल्यापैकी कोणालाच मागच्या जन्माचे काही आठवत नाही.
जन्म आणि मृत्यू एकमेकांना पूरक आहेत, सोबती आहेत. जगातील सर्व ऐश्वर्य क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे, शाश्वत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र त्यागून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर प्राप्त करतो. हेच भगवान श्रीकृष्णांनी भग्वद्गीतेतही सांगितले आहे. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हे जुने कपडे काढून नवीन घालण्यासारखे आहे. आजचा माणूस अपयशाची भीती, असुरक्षिततेची भीती इत्यादी अनेक प्रकारच्या भीतींनी ग्रासलेला दिसतो, पण या सगळ्यांपेक्षा एक भीती मोठी असते जी माणसाला आयुष्यभर त्रास देत असते, ती म्हणजे मृत्यूची भीती. प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, परंतु त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो हे अखंड सत्य नाकारत असतो, टाळत असतो आणि मृत्यू स्वीकारण्यास असमर्थ असतो. जीवन ही मृत्यूची संथ, प्रलंबित आणि निरंतर प्रक्रिया आहे. जे लोक म्हणतात मी मृत्यूला घाबरत नाही, ते देखील मृत्यूने दार ठोठावले असता डगमगतात.
मृत्यूमध्ये फक्त तीच क्रिया पूर्ण होते जी जन्मापासून सुरू होते आणि हे खरे आहे की मृत्यू जन्मापासूनच सुरू होतो, म्हणूनच 'अंत ही सुरुवात आहे' असे अनेकदा म्हटले जाते. गरुणपुराण आणि गीता या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केल्यास जन्म, मृत्यू आणि आत्मा यांच्याशी संबंधित घटक समजू शकतात. गीतेच्या शिकवणीत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा अमर आहे, त्याला अंत नाही, तो फक्त शरीराचे कपडे बदलतो. मृत्यूनंतर आत्म्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण देणाऱ्या गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा यमदूत ते घेण्यासाठी येतात असा उल्लेख आहे. मनुष्य आपल्या जीवनात जे कर्म करतो त्यानुसार यमदूत सोबत घेतात आणि पुढच्या देहात नेऊन सोडतात. धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या तथ्यांनुसार, जर मरणारा माणूस सज्जन आणि सद्गुणी असेल तर त्याच्या निधनाचे दुःख होत नाही, परंतु जर तो दुष्ट किंवा पापी असेल तर त्याला वेदना सहन कराव्या लागतात.
म्हणूनच काळ्या पाण्याची दोनदा शिक्षा अर्थात ५० वर्षांचा कडक कारावास होऊनही स्वातंत्र्यवीर सावरकर उत्स्फूर्तपणे कविता लिहितात, 'अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपु मजसी असा कवण जन्मला!" याच बळावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही लढा दिला आणि भारत भूमीला स्वातंत्र्य मिळाल्यावर, आपले जीवित कार्य संपल्याचे जाणवल्यावर प्रायोपवेशन करून अर्थात अन्न पाण्याचा त्याग करून मृत्यूला कवटाळले.
अशा रीतीने मृत्यूचे सत्य ज्याला कळते त्याचा जगण्याचा प्रवास सोपा होतो आणि मृत्यूची भीती न वाटता ही घटना केवळ जगण्याचा एक भाग आहे याची जाणीव होते .