नवीन वर्षात आर्थिक घडी बसवेपर्यंत एक महिनाही संपला. त्यात आज अर्थसंकल्प जाहीर झाल्याने अनेकांच्या नोकरी व्यवसायावर, घरखर्चावर त्याचे कमी अधिक प्रमाणात पडसाद उमटणार हेही निश्चित! अशात ज्योतिषाचे फासे आपल्या राशीच्या बाजूने पडले तर? म्हणजेच या महिन्याचे आर्थिक गणित कोलमडू नये अशा बेताने ग्रहमान अनुकूल असेल, तर बजेटची चिंता सतावणार नाही.
त्याबाबतीत पुढील सहा राशी चिंतामुक्त राहतील असे नजीकच्या काळातले ज्योतिषशास्त्राचे भाकित आहे. मात्र, हलगर्जीपणा करून चालणार नाही. आर्थिक निर्णय घेताना, तसेच आर्थिक व्यवहार करताना समजून उमजून टाकलेले पाऊल धनवृद्धीसाठी पोषक ठरेल. चला तर जाणून घेऊया, त्या सहा राशी कोणत्या आहेत.
मेष : अनेक दिवसांपासून आपणाला भेडसावत असलेली आर्थिक तंगी दूर होईल. कमाईचे वेगवेगळे मार्ग सापडतील. नव्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आताचा काळ अतिशय उत्तम आहे. १४ तारखेनंतर आर्थिक वृध्दी होण्याची संधी आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना तसेच खाजगी नोकरी करणाऱ्यांनादेखील बढतीची संधी चालून येईल.
वृषभ : वृषभ राशीसाठी हा काळ खूप धनलाभ करून देईल असे नाही, परंतु आधीपेक्षा स्थिती नक्कीच चांगली असेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती धीराने, संयमाने हाताळलीत तर भविष्यात खूप चांगल्या संधी हात जोडून उभ्या राहतील. त्याची तयारी आतापासून करावी लागेल. येत्या काळात आर्थिक अडचणी दूर होतील. तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा, दखल घेतली जाईल.
मिथुन : आर्थिक दृष्टीकोनातून फेब्रुवारी महिना तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आर्थिक मिळकतीची नवी साधने, नव्या वाटा खुल्या होतील. काही कारणास्तव खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून करा. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले, तर भविष्य उज्ज्वल आहे. तुमची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारणारा हा काळ आहे. संधीचे सोने करा.
कर्क : हा महिना आर्थिक दृष्ट्या आनंददायी ठरेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊन त्याचा योग्य मोबदलाही मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. भविष्याची काही तरतूद करून ठेवणार असाल, तर गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. अनावश्यक खर्च टाळा. महिन्याचा उत्तररार्ध तुम्हाला अधिक लाभदायक ठरेल.
सिंह : सिंह राशीसाठी हा महिना ठीक-ठाक असेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळणार नाही. परंतु प्रयत्न सुरू ठेवा. कदाचित बढती मिळू शकेल, जबाबदारीचे पद भूषवण्याची संधी मिळेल. जुनी येणी बाकी असतील तर ती या महिन्याच्या उत्तरार्धात मिळू शकतील.
कन्या : हा महिना आर्थिकदृष्ट्या मध्यम स्वरूपाचा असेल. अशात खर्चवाढीचीदेखील शक्यता आहे. व्यावसायिकांना नव्या संधी मिळतील, तसेच नोकरदारांची प्रगती होईल. पदोन्नतीचा मार्ग खुला होईल. त्यासाठी तुम्हाला अधिक कष्टाची तयारी दर्शवावी लागेल. एकदा का आर्थिक पकड बसली, की भविष्यातील आर्थिक वृद्धीचे द्वार खुले होईल.
तूळ : तूळ राशीसाठी हा महिना खूप चांगला आहे. तुमच्यावर असलेले कर्जाचे ओझे या महिन्यात उतरवता येईल. त्यासाठी आर्थिक मार्ग सापडतील. व्यवसाय, नोकरीत यश मिळेल. बाहेरगावी जाण्याचा योग आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा मोठा आर्थिक फटका किंवा नुकसान होऊ शकते.
वृश्चिक : आर्थिकदृष्ट्या हा महिना सामान्य असेल. वाढत्या खर्चांमुळे चिंताही वाढेल. अर्थात मिळकतीची नवी साधने, नवे मार्गही सापडतील. वृश्चिक राशीच्या लोकांना नेहमी गुंतवणूक आणि बचतीचा सल्ला दिला जातो, तो त्यांनी पाळावा. मिळकत वाढवण्यासाठी प्रयत्नही त्या पटीत वाढवावे लागतील. योग्य दिशेने कुच केलीत तर यशाचे शिखर गाठता येईल.
धनु : या राशीतील व्यावसायिकांना यशाची संधी आहे. परंतु नोकरदारांना आर्थिक चणचण जाणवू शकते. यासाठी आपले महिन्याचे बजेट लक्षपूर्वक तयार करा. मोठा खर्च उद्भवणार असल्याची चिन्हे आहेत. आपली आजवरची बचत कामी येऊ शकेल. सध्या तुम्हाला फक्त आर्थिक घडी बसवण्यावर लक्ष द्यायचे आहे. आगामी काळात आर्थिक प्रश्न आपोआप सुटतील.
मकर : मकर राशीसाठी हा महिना लाभदायक आहे. गुरुबळ मिळाल्यामुळे नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी आहे. नोकरदारांना पदोन्नती तर व्यावसायिकांना व्यापाराचे नवे मार्ग खुले होतील. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरेल. नवीन क्षेत्रात स्वत:ला आजमावून पहा, ते उत्पन्नाचे साधन ठरू शकेल.
कुंभ : या महिन्यात तुमचा अधिकतर खर्च दुसऱ्यांवर होणार असल्याची चिन्हे आहेत. मिळकतीचे मार्ग कमी असले, तरी हा महिना सर्वसामान्य स्थिती दर्शवतो. अनावश्यक खर्च या महिन्यात टाळले, तर आर्थिक गणित नीट जुळवता येईल, अन्यथा कर्जबाजारी व्हावे लागेल. त्यामुळे सावधान! हा महिना संपला की तुमची आर्थिक चणचण दूर होईल.
मीन : हा महिना तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. कर्जमुक्त होण्याचीही चिन्हे आहेत. आर्थिक अडचणी दूर होऊन उत्पन्नाचे मार्ग सापडतील. नोकरदारांना चढ-उताराला सामोरे जावे लागेल. परंतु आर्थिक स्थिती आवाक्यात असेल. मात्र व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. प्रयत्नात कुचराई करू नका. बचत वाढवा. विचारपूर्वक गुंतवणूक करा.