मराठी संतांच्या मनावर आद्य शंकराचार्यांच्या भाष्यापेक्षा त्यांच्या स्फुट प्रकरणांचा आणि विविध स्तोत्रांचा प्रभाव अधिक दिसून येतो. परमार्थाचे विवेचन, अध्यात्मनिरुपण, ब्रह्मविचार, आत्नानात्मविवेक अशासारखे विषय संतांना त्यांच्या प्रबंधात्मक ग्रंथासाठी उपयुक्त होते पण त्यांना आलेली ईश्वरी प्रेमाची अनुभूती ते कसे व्यक्त करणार? खरे म्हृनजे असा अनुभव जसाच्या तसा व्यक्त करणे अवघड आहे, तरी संत स्त्री पुरुषांनी हे अनुभव यथार्थपणे शब्दबद्ध केले आहेत.
संतांना किंवा विचारी पुरुषांना प्रश्न पडतो की, आपण कोण आहोत? कोठून आलो? कोठे निघालो आहोत? आपल्या येण्याचा हेतू तरी काय? अशासारखे प्रश्न जिज्ञासू माणसासमोर नेहमी उभे असतात आणि अगदी प्रारंभापासून तत्त्वजिज्ञासू माणसांनी विचारपूरर्वक या प्रश्नांचा खुलासा केला आहे. आपण कोण आहोत? हे शरीर म्हणजे आपण का? आत्मा म्हणजे आपण का? प्राण, जीव म्हणजे काय? मृत्यूनंतर याचे काय होते? असे नअनेक प्रश्न तत्त्वेत्त्यांनी व संतांनी विचारात घेतले आहेत.
आद्य शंकराचार्य म्हणतात की, मन, चित्त, बुद्धी, अहंकार, डोळे, नाक, कान, जिव्हा, त्वचा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यापैकी आपण कोणीही नाही. आपन केवळ शिवस्वरूप आहोत. आपण चिदानंद रूप आहोत. शंकराचार्य पुढे म्हणतात, की प्राण, व्यान, अपान, समान, उदान हे पाच प्राण रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे सात धातू, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय हे पाच कोश, वाणी, हात, पाय, जननेंद्रीय, गुद ही पाच कर्मेंद्रिय यात मी नाही, तर मी केवळ चिदानंदरूप आणि शिवरूप आहे.
शंकराचार्य या स्तोत्रात म्हणतात, द्वेष, राग, लोभ, मद, मत्सर, म्हणजे मी नाही. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांपैकी मी नाही. मी केवळ चिदानंदरूप व शिवस्वरूप आहे. शंकराचार्य म्हणतात की-
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं,न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा:,अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता,चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम्
शंकराचार्यांच्या मते मी पुण्य नाही, की पाप नाही. सुख नाही अथवा दु:खही नाही. मी मंत्र, तंत्र, वेद, यज्ञ भोजन, भोज्य, भोक्ता यापैकी कोणीही नाही. मी केवळ चिदानंदरूप शिवस्वरूप आहे. मी अज म्हणजे जन्म नसणारा आहे. मला मृत्यूचे भय नाही. मी अनादी, नित्य, निरवयव असून मला मातापिता नाहीत. बंधू नाहीत. मित्र नाहीत. मी स्वयंभू आहे. मी केवळ चिदानंदरूप आणि शिवस्वरूप आहे.