'नियम हे मोडण्यासाठीच असतात' असे काही जण अभिमानाने सांगतात. परंतु तसे नसते, किंबहुना तसे नसायला हवे. नियम अर्थात सामाजिक चौकट, जी सर्वांच्या हिताचा विचार करून आखली जाते. ती चौकट मोडण्यात कोणाचे हित आहे? सिग्नल लागल्यावर गाडी थांबवावी हा साधा नियम आहे, पण तो उल्लंघून गेल्यामुळे अपघात होतात.
आपल्या देशात नियम मोडणारी मंडळी परदेशात शिक्षेच्या भीतीने नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. अगदी रात्री-बेरात्रीसुद्धा सिग्नल लागल्यावर, रस्त्यावर कोणी असो वा नसो, त्यांना गाडी थांबवावीच लागते. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना संगणकीय यंत्रणेने दंड आकारला जातो. म्हणून तिथे कोणीही थुंकणे, कचरा टाकणे, वाटेल त्या दिशेने, वाटेल तेवढ्या वेगाने गाडी नेणे, पार्विंâग करणे इ. गैरप्रकार करत नाहीत.
याउलट आपल्या देशात पदोपदी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. या सवयींमुळे आपण स्वत:चे आणि समाजाचे नुकसान करत आहोत, ही बाब आपल्याला लक्षात येत नाही. आपण जसे वगतो, त्याचे अनुकरण पुढची पिढी करत असते. 'फेरारी की सवारी' चित्रपटात वडील आपल्या मुलाबाबतीत म्हणतात, 'जो देखेगा वही सिखेगा!' त्यामुळे मुले बिघडतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या गैरवर्तनाला आपण तर जबाबदार नाही ना, याची पालकांनी अवश्य खात्री करून घ्यावी.
ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे. सामाजिक नियम आपल्याला माहित आहेच, वैयक्तिक उन्नतीसाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत, ते जाणून घेऊ...
सत्य - सत्याचरण करणे.अहिंसा - काया, वाचा, मनाने कोणालाही न दुखवणे.अस्तेय - कोणालाही न फसवणे.ब्रह्मचर्य - विषयांचे परिमित सेवन करत त्यातून ईश्वरसेवा साधणे.अपरिग्रह - अनावश्यक साठा न करणे. अनावश्यक चिंतन न करणे.शौच - काया, वाचा, मनाने शुद्धतेचे आचरण करणे.संतोष - प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या भोगांमध्ये समाधान मानणे.तप - जीवनभर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी, उद्धारासाठी झटणे. स्वाध्याय - शुद्ध ज्ञान, भक्ती जागवणारे ग्रंथ वाचणे, त्यानुसार आचरण करणे.ईश्वरप्रणिधान - परमेश्वराच्या इच्छेने सर्व चालू आहे याची जाणिव ठेवणे आणि परमेश्वराच्या चिंतनातच राहणे.
या गोष्टींचे आचरण केले असता, नियमांचे उल्लंघन होत नाही आणि यम जवळ येत नाही.