प्रख्यात लेखक व. पु. काळे यांचे एक छान वाक्य आहे, 'माणसाला अपयशाची भीती वाटत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला कारण न मिळाल्याची भीती वाटते!' खरोखरच, आपण सगळे आपल्या यशासाठी स्वतःला आणि अपयशासाठी दुसऱ्याला जबाबदार धरत असतो. परंतु याच दुर्गुणामुळे आपण आपल्या प्रगतीच्या आड येत आहोत. कसे? वाचा ही गोष्ट!
एकदा एका उंच झाडावर असलेल्या घरट्यातून गरुडाचे एक अंड झाडावरून घरंगळत खाली येते. त्या झाडाच्या पायथ्याशी कोंबडीने संसार थाटलेला असतो. ती तिथे आपली अंडं उबवीत असते. आणखी एका अंड्याची भर पडलेली पाहून ती वात्सल्याने त्या अंड्यालाही उब देते. यथावकाश अंड्यातुन कोंबडीची पिल्लं बाहेर येतात. त्याचवेळेस गरुडाचे पिल्लू देखील अंडं फोडून बाहेर येते.
कोंबडीची पिल्लं तिच्या पाठोपाठ दाणा पाणी गोळा करायला शिकतात. गरुडाचे पिल्लूही त्यांच्यातले एक होऊन राहते. एक दिवस एका शेतकऱ्याचे लक्ष जाते. गरुडाच्या पिल्लाला त्याच्या अधिवासात पुन्हा पाठवायला हवे, अशा विचाराने शेतकरी त्या पिल्लाला उंच उडवू पाहतो. परंतु जन्माला आल्यापासून उडण्याचे प्रशिक्षण न मिळाल्याने ते पिल्लू जमिनीवर दाणकन आदळते. त्याला जखम होते.
पुन्हा एक दिवस शेतकरी प्रयत्न करतो. यावेळेस तो पिल्लाचे पाय धरतो आणि त्याची मान आकाशाकडे धरतो. सुर्यकिरण डोळ्यात जाऊ लागल्याने पिल्लाला त्रास होतो. कारण इतके दिवस त्याची नजर फक्त जमिनीवर दाणे धुंडाळत असते. विस्तीर्ण आकाशाकडे त्याची नजरच गेलेली नसते. पहिल्यांदा ते आकाशाकडे पाहते. आणि तो त्रास सहन न होऊन सर्व शक्तीनिशी पंखांची उघडझाप करून आकाशात भरारी घेते. गरुडाला आकाश खुणावते आणि गरुड भरारीच्या क्षमतेचे आकलन होते.
आपण सगळेच जण अशा गरुड भरारीच्या प्रतीक्षेत आहोत. पण त्यासाठी कोणी आपले हात पाय धरून ठेवेल याची वाट पाहत थांबू नका. परिस्थिती हाताबाहेर गेली, तर नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसते. म्हणून वेळीच आपले क्षितिज ओळखा, क्षमता ओळखा, आपण जे विश्व पाहतोय त्याच्याही पलीकडे मोठे विस्तीर्ण आकाश आहे, याची जाणीव ठेवा आणि स्वयंस्फूर्तीने गरुडझेप घ्या! मग कोणीही तुमच्या यशाच्या आड कधीच येऊ शकणार नाही!