ज्योत्स्ना गाडगीळ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत एक किस्सा सांगितला जातो. रायगडाच्या बांधकामावर देखरेख करत असताना, अत्यंत समाधानाने महाराज सभोवताली पाहत होते. सर्व कामगार, फौज, लवाजमा आणि गडावरून दिसणारा आसमंत पाहून आपल्या स्वराज्य आणि सुराज्याचे आपण पोशिंदे आहोत, हा विचार त्यांना सुखावून गेला. त्याचवेळेस समर्थ रामदास स्वामी, `जय जय रघुवीर समर्थ' म्हणत तिथे आले. त्यांनी महाराजांच्या नजरेतले भाव ओळखले. 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' म्हणून कारागीरांना बोलावून, महाराजांच्या बाजूला असलेला भला मोठा खडक फोडून घेतला. तेवढ्यात एक बेडकी टुनकन उडी मारून खडकातून बाहेर आली. तिच्याकडे बोट दाखवून समर्थ म्हणाले, 'महाराज, आपण धन्य आहात, आपल्या राज्यात या बेडकीणीचेही पालन-पोषण व्यवस्थित होत आहे.'
महाराज खजिल झाले. त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी ती कबुलही केली. त्यावर समर्थ म्हणाले, 'महाराज, आपण या स्वराज्याचे विश्वस्त आहात, मात्र या चराचराचा पोशिंदा वेगळा आहे. त्यानेच या खडकामधील बेडकीणीला सुखरूप जीवंत ठेवले. तिच्या पोटपाण्याची व्यवस्था केली. म्हणून आपण पोशिंदे आहोत, हा विचार मनातून काढून टाकावा,
तू टाक अहंता राजा। नव्हेशी तू पोशिंदा।।किमयाकर्ता रघुराणा। विश्वंभर पालनकर्ता।।
हेही वाचा: फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)
हा प्रसंग खरोखरच घडला की नाही, हा चर्चेचा विषय नसून त्या प्रसंगातील आशय महत्त्वाचा आहे. समर्थांनी केलेला बोध आपणही लक्षात घेण्यासारखा आहे. सणवाराला आपण कोणाला जेवू-खाऊ घालतो, दान-धर्म करतो आणि स्वत:ला लगेचच सर्वेसर्वा समजू लागतो. मात्र तसे समजण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाची सोय देवाने लावून ठेवलेली असते. हेच सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
बाळा दुग्ध कोण, करितो उत्पत्ती,वाढवे श्रीपती, सवे दोन्ही।।
मातेच्या गर्भात बाळाचे बीज रोवले गेले, की तो जन्माला येण्याआधीच त्याच्या भूकेची सोय देवाने लावून दिलेली असते. बाळाची वाढ आणि त्याचे पोषण या दोन्हीची जबाबदारी भगवंत पार पाडत असतो आणि आपण गैरसमजूतीत जगतो, की आपण मुलांना लहानाचे मोठे केले. भगवंताखेरीज कोणी कोणाचा सांभाळ करत नसतो. सांभाळण्याची जबाबदारी व्यक्तीपरत्वे भगवंत वाटून देतो, म्हणून आपण त्या कार्याचा हिस्सा होतो.
आजवर त्याने कोणाचीही उपासमार होऊ दिलेली नाही. चोच दिली, तो चारा देतोच! घरातलेच उदाहरण पाहा. घरात किती जण राहतात, असे विचारले तर आपण घरातल्या व्यक्तींची संख्या सांगतो, परंतु असंख्य जीव आपल्या सोबतीने एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यांचे आपण पालन-पोषण करीत नाही. आपण घरातल्या पाळीव प्राण्यांना वेळच्या वेळी जेवू-खाऊ घालतो, त्यांचे आजारपण काढतो. मात्र, गल्ली-बोळातल्या, राना-वनातल्या प्राण्यांना काय हवे नको ते कोण विचारतो? त्यांची गुजराण कशावर होते, याचा विचार आपल्या मनात डोकावतो का? तरी ती जगतात, कारण त्यांना जगवणारा, त्यांची काळजी घेणारा कैवारी सर्वांवर लक्ष ठेवून असतो. हे विसरून कसे चालेल? म्हणून तुकाराम महाराज विचारतात,
का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाचि।
क्रमश:
हेही वाचा: संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह