एके दिवशी वैकुंठात नारायण लक्ष्मी बोलत बसले असता लक्ष्मीने प्रश्न केला, `देवा, पृथ्वीवर तुमच्या भक्तांची संख्या जास्त, की माझ्या भक्तांची? मला तरी वाटते, की माझेच भक्त जास्त असतील' यावर नारायण म्हणाले, `तू म्हणतेस तुझ्या भक्तांची संख्या जास्त, मी म्हणेन माझ्या भक्तांची संख्या जास्त. त्यापेक्षा आपण दोघेही पृथ्वीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून येऊ.'लक्ष्मी म्हणाली, `देवा, तुम्ही पुढे व्हा आणि शास्त्री बुवांचे सोंग घेऊन एका खेड्यात प्रवेश करा. मी सुद्धा पाठोपाठ तुमची जोडीदार म्हणून वेषांतर करून येते.' दोघांनी वेषांतर केले. पृथ्वीवर आले. नारायणांनी धोतर नेसलेले असून, अंगावर उपरणे पांघरले होते. कपाळाला गंध लावले असून काखेत भागवताची पोथी घेतली होती. शास्त्रीबुवांनी एका खेडेगावात प्रवेश केला. त्यांनी एका श्रीमंताच्या दारात जाऊन घरमालकाला सांगितले, `मी शास्त्री आहे. मला चातुर्मासाात पुराण सांगण्याची इच्छा आहे. तेव्हा गावात जागेची कुठे सोय होईल?' श्रीमंताने उत्तर न देता, शास्त्रीबुवांना पिटाळून लावले.
शास्त्रीबुवा प्रत्येक घराचे निरीक्षण करीत चालले होते. अर्धा दिवस फिरण्यात गेला. परंतु कोणीही त्यांची आपुलकीने चौकशी केली नाही. त्यावर त्यांनी वैकुंठात परण्याचा विचार केला. तेवढ्यात बुवांना एक गृहस्थ दिसला. त्याची बायको, मुले घराचे छत कोसळून ठार झाली होती. दुकानाचेही दिवाळे निघाल्यामुळे तो दु:खी, कष्टी झाला होता. मन:शांतीच्या शोधात फिरत असताना, त्याला शास्रीबुवा नजरेस पडले. तो सगळे दु:ख विसरून बुवांना म्हणाला, `तुम्ही कोण, कुठले?' सगळी विचारपूस करून, गावभर दवंडी पिटवून त्याने गावातल्या नारायण मंदिरात बुवांची सोय लावून दिली. पुराण सुरू झाले. गावकरी येऊ लागले. देवळातली जागा अपुरी पडू लागली.
आता लक्ष्मी परीक्षा घेण्यासाठी वेषांतर करून गावात प्रगट झाली. तिने सगळी घरे धुंडाळली, परंतु सगळ्या दारांना कुलूप होते. मंडळी पुराण ऐकण्यासाठी गेली होती. लक्ष्मीला तहान लागली होती. ती नाईलाजाने देवळाकडे वळली. तेवढ्यात एका झोपडीत दिवा दिसला. तिथली एक आजी, गुडघेदुखीमुळे देवळात जाऊ शकली नाही. लक्ष्मीने आजीकडे पाणी मागितले. आजीने विचारपूस केली आणि पाण्याबरोबर दहीपोहेदेखील खायला दिले. लक्ष्मी पाहुणचार घेऊन निघून गेली. थोड्यावेळाने आजीची सून घरी आली. पाहते तर काय, पाण्याचा पेला सोन्याचा झाला होता. आजीने घडलेली हकीकत सांगितली.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पुन्हा येईल, या विचाराने सुनबाई पुराण ऐकायला न जाता, घरीच थांबली. म्हणता म्हणता गावभर ही वार्ता पसरली. लक्ष्मीची वाट बघत गावकरी देखील दाराकडे डोळे लावून बसले. लोकांचा स्वार्थ भाव पाहून लक्ष्मी खिन्न मनाने देवळाकडे वळली. तिथे शास्त्रीबुवांच्या रूपाने नारायण आणि त्यांची सोय लावून देणारा गृहस्थ एकटाच श्रोता म्हणून बसला होता. त्याला पाहता, लक्ष्मी आणि नारायण यांनी मनोमन स्पर्धेचा निकाल लावला. त्या गृहस्थाची निष्काम सेवा पाहून नारायणाने त्या आशीर्वाद आणि लक्ष्मीने त्याचे गतवैभव प्राप्त करून दिले.
तात्पर्य हेच, की जग लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी धडपडते. परंतु, लक्ष्मीचे नारायणावर निस्सिम प्रेम असल्यामुळे ती नारायणाला प्राप्त केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून श्री तिथे सौ...!