ज्याला सर्व ठिकाणी पूजेचा पहिला मान असतो, असा बाप्पा वाहन म्हणून एवढ्याशा उंदराची निवड करतो, यात विरोधाभास जाणवतो,नाही का? परंतु, त्या रूपकामागे दडलेला अर्थ समजून घेतला, तर बाप्पाच्या दूरदृष्टीचे आपल्याला निश्चितच कौतुक वाटेल. तत्पूर्वी याबाबत सांगितली जाणारी पौराणिक कथा जाणून घेऊया.
एक दिवस इंद्राच्या दरबारात काही औचित्य असल्यामुळे नृत्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा सूत्रधार अर्थात प्रमुख कलाकार होता क्रौंच नावाचा एक गंधर्व! देवलोकातील त्या खास सभेची आणि सभासदांची उठबस करताना त्याचा पाय चुकून एका ऋषींना लागला आणि त्यांना यातना असह्य झाल्याने त्यांनी रागाच्या भरात त्याला शाप दिला, की सभेमध्ये उंदरासारखी लुडबूड करणाऱ्या गंधर्वा, तू पृथ्वीवर उंदीर होऊन फिरशील.
क्रौंच गयावया करू लागला. क्षमा मागू लागला. परंतु त्याला ती शिक्षा भोगावी लागली. गंधर्व योनीतून थेट तो उंदीर योनीत प्रवेश करता झाला आणि नेमका तो एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला. उंदरांच्या मूळ वृत्तीप्रमाणे तो अन्नधान्याची नासधूस करू लागला. सर्वांनी त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्या आश्रमात बाप्पाचे आगमन झाले असता, ऋषींनी ही समस्या बाप्पाच्या कानावर घातली. बाप्पाने अवघ्या काही क्षणात सापळा रचून उंदराला पकडले.
उंदराने हात जोडले. सर्वांची माफी मागितली. आपण शापित गंधर्व असल्याची ओळख पटवून दिली. तेव्हा बाप्पाने त्याला अभय दिले आणि वर माग म्हटले. त्यावर तो गंधर्व म्हणाला, `पुन्हा गंधर्व होऊन गायन नृत्य करण्यात मला रस नाही, त्यापेक्षा साक्षात तुझ्या पायाशी येण्याची संधी मिळाली आहे, तर तू मला तुझा दास करून घे. अगदी वाहन होऊन येण्याचीही माझी तयारी आहे.' यावर बाप्पा म्हणाले, `अरे पण तुझा माझा भार पेलवेल तरी का? तू दबून जाशील!'
गंधर्व म्हणाला, `हरकत नाही देवा, जेवढा काळ शक्य तेवढी तुमची सेवा हातून घडल्याचे समाधान तरी मिळेल!'त्याचे हे बोलणे ऐकून बाप्पाने त्याला तथास्तू म्हटले आणि त्या दिवसापासून क्रौंच हा शापित गंधर्व बाप्पाचे वाहन बनला.
ज्याप्रमाणे ही पौराणिक कथा समर्पक वाटते, त्याचप्रमाणे उंदराचा वाहन म्हणून केलेला वापर हा रुपक कथेचा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो. म्हणून वाईटाकडे वेगाने धावणारे मन, अज्ञान, अंधश्रद्धेने पोखरले जाणारे मन नियंत्रणात राहावे, यासाठी आपण बाप्पाची प्रार्थना करतो आणि त्याला विनवणी करतो...
मोरया मोरया मी बाळ तान्हे,तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी।