सीतेचे अपहरण झाले, तेव्हा राम लक्ष्मणासह सीतेच्या शोधार्थ निघाले होते. वाटेत त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. सीतेचा शोध घेण्याकरता हनुमंतानेच सुग्रीव, जांबुवंत आणि आदी वानरसेनेशी हनुमंतांनी रामाचा परिचय करून दिला होता. सीतेला रावणाने पळवून लंकेत नेले आहे, हे कळल्यावर सीतेचा तपास काढण्यासाठी रामांनी हनुमंताला लंकेत जाण्यास सांगितले. तेव्हा हनुमंताने आपली असमर्थता व्यक्त केली. समुद्र पार करून लंकेत जाण्यास आपण योग्य नाही, असे म्हटले. तेव्हा त्याला जांबुवंतांनी त्याच्या ठायी असलेल्या अपार शक्तीची जाणीव करून दिली. परंतु, प्रश्न असा पडतो, की तोवर हनुमंत स्वतःकडे असलेल्या शक्तीपासून एवढा अनभिज्ञ का होता? हनुमंताने जन्मतःच भूक लागली म्हणून सूर्याचा गोळा फळ समजून खाण्यासाठी आकाशी झेप घेतली होती. सूर्याला गिळंकृत करायला निघालेल्या हनुमानावर देवेंद्राने वज्रप्रहार केला. त्यामुळे तो मूर्च्छित होऊन पडला. त्याला पाहून पवन देवांनी रागाने आपले काम थांबवले. सजीव सृष्टी हादरून गेली. सगळे देव त्यांना शरण आले. तेव्हा पवन देवांनी त्यांना अट घातली, 'माझ्या मुलाला शुद्धीवर आणा, तरच मी माझे कार्य पुन्हा सुरु करतो.
देवेंद्राने हनुमंताला शुद्धीवर आणले आणि त्याच्यासकट सर्व देवांनी हनुमंताला आशीर्वाद आणि आपल्या जवळील विविध अस्त्र भेट म्हणून दिले. त्यामुळे बाल हनुमान सर्व शक्तिमान झाला होता. मात्र बाल वयात त्याला या शक्तीचा सदुपयोग कसा करावा हे माहीत नव्हते. तो खोडकर होता. त्याच्या खोड्यांमुळे सगळे त्रासले होते. विशेष म्हणजे ऋषी मुनी त्रस्त झाले होते. तेव्हा भृगु वंशातील ऋषींनी त्याला शाप दिला, 'हनुमंता तू तुझी शक्ती गमावून बसशील.'
त्याच्या वतीने त्याच्या आई वडिलांनी माफी मागितली. तेव्हा ऋषींनी सांगितले, 'जेव्हा तुझ्या शक्तीची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा कोणी तुला त्या शक्तींची आठवण करून दिली तर या शक्ती परत मिळतील.'
या आशिर्वादानुसार जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि हनुमंताला आपल्या शक्तीची प्रचिती आली.
म्हणून कठीण प्रसंगी कोणी गर्भ गळीत झाले असता, त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणे, या प्रसंगाची तुलना रामायणातल्या या प्रसंगाशी केली जाते.