भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांना सूर्यास्तानंतर जाण्याची परवानगी नाही. मात्र, त्यापैकी काही जागा आता पर्यटन स्थळं बनली आहेत. मात्र मध्य प्रदेशात देवीचे एक मंदिर आहे, जिथे लोक सूर्यास्तानंतर जायला घाबरतात. अनेकांना तिथे सूर्यास्तानंतर गेले असता चित्रविचित्र अनुभव आल्याचे म्हटले जाते. काय असेल त्यामागचे कारण? जाणून घेऊ.
प्राचीन आणि ऐतिहासिक दुर्गामातेचे हे मंदिर मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात आहे. लोक संध्याकाळी या मंदिरात जायला घाबरतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. हे मंदिर तोडण्याचाही अनेकदा प्रयत्न झाला परंतु तो यशस्वी झाला नाही.
दुर्गा मंदिराचे निर्माण
पौराणिक कथेनुसार हे मंदिर देवासच्या महाराजांनी बांधले होते, परंतु मंदिर बांधल्यानंतर येथे अनेक अशुभ घटना घडत असत. या मंदिराशी संबंधित अनेक कथा आहेत, असे मानले जाते की राजघराण्याचा सेनापती आणि राजकुमारीची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. राजाचा या नात्याला नकार होता आणि तो त्यांच्या लग्नाच्या विरोधात होता. त्याने आपल्या मुलीला बंदिस्त ठेवले. सेनापतीचा विरह राजकन्येला सहन झाला नाही आणि अशातच तिचा मृत्यू झाला. राजकन्येच्या मृत्यूची बातमी कळताच सेनापतीनेही मंदिरातच प्राण त्याग केला. सेनापतीच्या मृत्यूनंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी महाराजांना मंदिर अपवित्र झाल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत या मंदिरातील जुन्या मूर्ती हटवून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात असा राजपुरोहितांनी सल्ला दिला. परंतु प्रयत्न करूनही तसे करणे शक्य झाले नाही. तेव्हापासून आजतागायत लोकांना त्या मंदिरात सायंकाळी आभास होतात. कोणाचा वावर असल्याचे जाणवते. अशा चित्रविचित्र अनुभवांमुळे लोकांनी त्या मंदिराला शापित मंदिर ठरवले.
तसे असले तरी दिवसा त्या मंदिरात भाविकांची रीघ लागलेली असते. तिथे यज्ञ याग देखील केला जातो. स्थानिक लोक सांगतात, की चुकीच्या हेतूने तिथे दर्शनाला येणाऱ्या लोकांना काही ना काही त्रास होतो. याअर्थी ते जागृत देवस्थानही म्हटले जाते. मात्र जसजशी संध्याकाळ होते, तसतसा भाविकांचा वावर कमी होऊ लागतो आणि मंदिराच्या जवळपासही कोणीच फिरकत नाही. तिथे नक्की आभास होतात की आणखी काही, हे जाणून घेण्याचे वैज्ञानिक प्रयत्नही झाले, परंतु अजूनपर्यंत काहीच निष्कर्ष हाती लागलेले नाहीत!