एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे.
एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इ. गोष्टी व्यर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो.
एकादशीचा संकल्प:
या दिवशी `मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्रीपरमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहं करिष्ये' असा संकल्प उच्चारून ताम्हनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही.
एकादशी व्रताची समाप्ती:
हे व्रत ऐंशीव्या वर्षांपर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली, तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी.
एकादशीची नावे :
प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला २४ एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपास करतो. परंतु, दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आमलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले, तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो.
एकादशीचा उपास शक्य नसेल तर 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा जप १०८ वेळा अवश्य करा.