स्वानुभवाचे बोल सर्वांना पटतात. संतांनीदेखील समाजाला उपदेश करताना `आधी केले मग सांगितले.' अशाच अनुभवाचे कथन करताना तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, `सुख पाहता जवापाडे, दु:खं पर्वताएवढे!' भल्या मोठ्या पर्वतासमोर जवाचा दाणा केवढासा. परंतु, महाराजांनी मुद्दामहून ही उपमा दिली, कारण, व्यक्तिगत आयुष्यात आपण ते नेहमीच अनुभवतो, फक्त मान्य करत नाही. दु:खाचा डोंगर केवळ आपल्याच आयुष्यात नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. त्रयस्थ म्हणून पाहताना, आपल्याला स्वत:चे दु:खं पर्वताएवढे आणि दुसऱ्याचे दु:खं जवाएवढे वाटत असते. मात्र, हीच परिस्थिती समोरच्याला आपल्याबाबत वाटत असते. परंतु, संत तटस्थपणे समाजाकडे पाहतात आणि अभ्यासाअंती भाष्य करतात. म्हणून त्याला संतवचन म्हणतात. त्यातून शिकण्याऐवजी ते चुकीचे ठरवले, तर काय होते, वाचा.
एक श्रीमंत गृहस्थ होता. त्याच्या वयाला पन्नास वर्षे झाली, पण त्याला कधी दु:खाची झळ लागली नव्हती. कोणी त्याच्यापुढे आपले दु:ख सांगितले, तर त्याला ते पटत नसे. त्या गावात एक साधू होता. तो अभंग किंवा श्लोक म्हणत दारोदार फिरे. कोणी भिक्षा घातली, तर घेई नाहीतर तसाच पुढे निघून जाई.
हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!
एके दिवशी तो साधू त्या श्रीमंताच्या दारात उभे राहून `सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' असे म्हणाला. ते ऐकताच तो श्रीमंत बाहेर गेला आणि बाहेर जाऊन साधूला म्हणाला, `हे बुवा माझा अनुभव वेगळा आहे, `दु:ख पाहता जवापाडे, सुख पर्वताएवढे' असे म्हणा.
त्यावर साधू म्हणाला, `हे काही माझ्या पदरचे वाक्य मी म्हणत नाही, तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी हे म्हटले आहे.'
त्यावर श्रीमंत म्हणाला, `हे वाक्य कोणी लिहिले, हे जाणून घ्यायची माझी इच्छा नाही. मी सांगतोय तसे जर तुम्ही म्हणणार नसाल, तर उद्यापासून माझ्या दारासमोर येत जाऊ नका.'
साधूने मान डोलावली आणि तो निघून गेला. त्यानंतर अनेक दिवस साधू त्या दिशेने फिरकलादेखील नाही.
एक दिवस श्रीमंत माणूस नदीवर फेरफटका मारायला गेला. तिथे त्याचे लक्ष नसताना एका खेकड्याने नांगी मारली. श्रीमंत माणूस जोरात कळवळला. काही केल्या त्याच्या वेदना कमी होईना. तो वैद्यराजांकडे गेला, औषधपाणी केले, तरी त्याचे दु:ख कमी होईना.
तेव्हा अचानक श्रीमंत माणसाच्या मनात विचार आला, की साधूला आपण म्हटले होते, की दु:ख पाहता जवापाडे, सुख पर्वताएवढे. माझ्या याच बोलण्याचा, साधू महाराजांना दुखावल्याचा आणि संतवचन खोटे पाडण्याचा देवाला राग आला असावा, म्हणून देवाने मला ही शिक्षा दिली असावी. हे आठवून श्रीमंत माणसाने साधूचा शोध घेत त्याला बोलावणे पाठवले. त्याची माफी मागितली. आणि त्याला सांगितले, `आपण म्हटले, तेच बरोबर आहे. सुख पाहता जवापाडे आणि दु:ख पर्वताएवढे!
आयुष्य क्षणभंगुर आहे. त्यातला बराचसा वेळ झोपण्यात, रुसवे फुगवे काढण्यात, चिडण्यात, ओरडण्यात वाया जातो. यातून उर्वरित आयुष्याचे क्षण आपण कसे वापरतो, यावर आपल्या सुख दुःखाचे पारडे अवलंबून असते, असे सांगताना तुकाराम महाराज जव आणि पर्वत यांचे उदाहरण वापरत आहेत.
हेही वाचा : प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास