वैशाख शुक्ल चतुर्थीला मयूरक्षेत्री जाऊन परशुरामाने मयूरेश्वराची आराधना केली. त्यावेळी प्रत्यक्ष गणेशाने त्याला आपला परशू देऊन `क्षत्रियांचा पाडाव करण्यात यश मिळेल' असा वर दिला. म्हणून या तिथीला परशुवाह असे मिळाले. या दिवशी गणेशपूजा करून योग्य व्यक्तीला दानात शंख द्यावा. त्यामुळे व्रतकर्ता अक्षय्य सुखास पात्र ठरतो, असे फल सांगितले आहे.
गणेशाच्या प्रिय तिथीला परशुरामाच्या कथेची जोड मिळालेली ही चतुर्थी अद्वितीय पराक्रम करणाऱ्या विनायकाचे आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या परशुरामाचे एकाचवेळी स्मरण करण्याची आपल्याला संधी देते. त्यांच्या शौर्याचे, तेजाचे गुणगान यानिमित्ताने आपण करू शकतो. त्यांच्या चरित्र कथेवरून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मानवजातीला मिळते.
उपास करणे शक्य नसल्यास निदान या दोघांचे मनन, चिंतन, स्मरण करावे. मुलांना विनायक आणि परशुराम या दोघांच्या पराक्रमाच्या कथा या दिवशी आवर्जून सांगितल्या जाणे आवश्यक आहे. शाळांमधून असे कथनाचे प्रयोग व्हावेत. युद्धभूमीशी निगडित शूरांचा यथोचित सत्कार करावा. युद्धविषयक शिक्षणात नेत्रोदीपक यश मिळवणाऱ्या मुलांचा जाहीरपणे गौरव करावा. त्यांना यथोचित पुरस्कार द्यावा. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे. सैनिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी द्याव्यात. अशा सैनीकी शाळांनीही नागरिकांशी वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी पुढे यावे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांनी गणेश देवस्थानांना, परशुराम मंदिरांना, सैनिकांसाठी मदतकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना मदत करावी. आणि आजच्या तिथीचे स्मरण राहावे, म्हणून अन्यायाविरुद्ध शंख फूंकण्यासाठी शंखाचे दान करावे व सर्व विषयांमध्ये जागृत राहून सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यावी.