हिंदू दैवतांचे वैशिष्ट्य पाहिले, तर सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहेत. शंकराला बेल, कृष्णाला तुळस, विष्णूला कमळ, तर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, असे म्हणतात. याचाच अर्थ परमेश्वर भक्ती भावाने अर्पण केलेल्या फुला फळानेही प्रसन्न होतो, फक्त ते अर्पण करताना आपल्या मनीचा भाव शुद्ध हवा.
आज संकष्टी. घरोघरी बाप्पाचे आवडते मोदक केले जातील व भक्तिभावे दुर्वांकुर वाहिले जाईल. एवढा वैभवसंपन्न बाप्पा दुर्वांच्या त्रिदलाने संतुष्ट का होतो, हा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असेल.
त्यामागील पौराणिक कथा :
ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता. देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्याच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असूराला गिळून टाकले. तो असुर अग्नीसारखा तप्त होता. त्याला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, गणरायाने सांगितले, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
दुर्वा कशा वहाव्यात?
दुर्वा म्हणजे गवत. जे सहजपणे कुठेही उपलब्ध होते. दुर्वांच्या एका जुडीत २१ दुर्वा असतात. या जुडीसाठी प्रत्येक दुर्वा निवडताना त्यात त्रिदल असलेले पाते निवडले जाते. त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते. अनेक ठिकाणी अशा २१ जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते. त्यानिमित्ताने दुर्वांची जुडी बनवताना अथर्वशीर्षाची २१ आवर्तनेदेखील केली जातात. वेळेअभावी ते शक्य नसेल, तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक आवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात. तेही शक्य नसेल, तर निदान दुर्वाचे एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू बाप्पाकडे ठेवून भक्तिभावे अर्पण करावी.
दुर्वांना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. कारण दुर्वांचा गुणधर्म अनेक प्रकारच्या रोगांना 'दूर व्हा' असे सांगतो, अर्थात दूर ठेवतो. त्याबद्दल चर्चा पुन्हा कधी. तूर्तास 'वाहतो ही दुर्वांची जुडी' म्हणत बाप्पा मोरया करूया!!!