घर आहे, माणसं आहेत, पण संवाद हरपत चालला आहे. का? कशामुळे? याचा कधी शांतपणे विचार केला आहे का? मोबाईलमुळे - असे चटकन उत्तर देऊन तुम्ही मोकळे व्हाल. जे बहुतांशी खरे आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही! काळानुरुप भौतिक बदल घडत राहणार, ते व्हायलाही हवेत. परंतु त्या बदलाचा प्रभाव नातेसंबंधांवर होणे अपेक्षित नाही. गौर गोपालदास प्रभू सांगतात-
घर म्हटले की भांड्याला भांडे लागणार आणि आवाज होणार. एका भांड्याचा आवाज होत नाही. दोन भांड्यांचा होतो, दोनापेक्षा जास्त भांड्यांचा होतो. तसेच एकटा राहणारा मनुष्य कोणाशी वाद घालणार? पण तेच दोघेजण असतील विंâवा दोनापेक्षा जास्त जण असतील तर वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा फक्त त्रास करून घ्यायचा ठरवलं तर नाती दुरावणारच.
नाती दुरावण्यामागे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपण फक्त आपल्या आवडी निवडीचा विचार करतो. आपल्याला आवडते तसे दुसऱ्याने वागले, तर ती व्यक्ती चांगली. आपल्या मनाविरुद्ध वागली की वाईट. त्यामुळे वाद होतात आणि वाद विकोपाला गेले की एकटेपणा जाणवतो, एकटे राहावेसे वाटू लागते आणि नाते शरीरानेच नाही तर मनानेही दुरावते.
आपण दुसऱ्याचे दोष उगाळत बसतो. परंतु त्याच्याकडून घेण्यासारख्या, शिकण्यासारख्या कितीतरी चांगल्या गोष्टीदेखील आहेत हे आपण विसरून जातो. त्याने आपल्यासाठी काय केले नाही, याची यादी आपल्याकडे तयार असते, परंतु न सांगतानी त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेला त्याग, कष्ट, प्रेम याची नोंद आपण ठेवत नाही. कारण आपला इगो, अहंकार आडवा येतो.
व्यक्ती वाईट नसते, आपला अहंकार वाईट असतो. तो आपल्या डोळ्यावर चांगुलपणा दिसणार नाही अशा पद्धतीने पट्टी बांधतो. ती पट्टी आपणच आपली सोडायला हवी. मग हेच जग आपल्याला किती सुंदर वाटू लागेल बघा! आपला जीवनसाथी, ज्याच्यावर कधी काळी आपण खूप प्रेम केले, त्याचा तिरस्कार वाटणे बंद होईल. मुलांच्या जन्माच्या वेळी झालेला आनंद आठवला, की त्यांनी दिलेला त्रास शुल्लक वाटू लागेल. आपल्या बालपणी आईवडीलांनी घेतलेले कष्ट आठवले, की म्हातारपणी त्यांचे साधे बोलणे कटकटीसारखे वाटणार नाही. ही समज एकदा येऊ लागली, की नाती दुरावण्याची भीती नाहिशी होईल.
नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा.