>> शंतनू ठाकरे
हिंदू धर्मात गुरुंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरू आणि देवामध्ये प्रथम गुरूची पूजा केली जाते. गुरूच आपल्याला खरा मार्ग दाखवतात. त्यांच्या आशीर्वादानेच जीवनात यश मिळते.
गुरुमंत्र देऊन गुरु आपल्या शिष्याला मायेच्या पसार्यातून खेचून वर काढतात. तेवढे गुरुमंत्रात "बळ" असते. "गुरुमंत्र" हा गुरूंच्या संकल्पाच्या रूपात असल्याने आणि एकदा का गुरूंनी "गुरुमंत्र" दिला, म्हणजे त्यांनी आपले पूर्ण दायित्व घेतले, असे असल्याने जीव आपोआपच जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होऊ लागतो.
मात्र, गुरुमंत्राच्या साहाय्याने उन्नती करवून घेण्याचे क्रियमाणकर्म मात्र त्याने चोख पार पाडले पाहिजे, तरच गुरुमंत्राच्या साहाय्याने तो पुढे निर्गुणाची शिडी चढू शकतो.’ "गुरुमंत्र" केवळ अक्षरच नाही; अपितु ज्ञान, चैतन्य आणि आशीर्वाद देखील आहे. गुरुमंत्रामुळे परमार्थात शीघ्र प्रगती होते. त्या चैतन्ययुक्त गुरुमंत्राला "सबीजमंत्र" किंवा "दिव्यमंत्र" म्हणतात.
ज्याला "गुरुमंत्र" लाभला, तो भाग्यवान असतो, त्याला फार मोठे वरदान प्राप्त झाले असे समजावे. गुरु आपल्याला आपल्या योग्यतेनुसार "गुरुमंत्र" देतात. आपल्याला त्याची उपासना/साधना या गुरुमंत्राद्वारे करावी लागते. गुरुंनी आपल्याला जो "गुरु मंत्र" दिला असेल तर त्या "गुरुमंत्राचा" आपण दररोज जप केला पाहिजे. जसे आपण शाळेत जातो तेव्हा रोज हजेरी घेतली जाते, तसेच रोज "जप" केल्यास आपली हजेरी "सद्गुरू" दरबारात लागली जाते."गुरु मंत्र" नसेल तर आपल्या ईष्ट दैवत म्हणजेच आपले आवडते दैवत त्यांच्या नामाचा जप करावा. "गुरु मंत्रा" मध्ये जितके अक्षर असतील तितके लाख जप झाल्यास मंत्र सिद्ध होतो, आणि सद्गुरूंच्या मुखातून घेतलेला "मंत्र" हा "सिद्धच" असतो.
"ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला"गुरु हे "ईश्वरी तत्व" आहे, शरीर नाही. सर्व तिर्थ हे गुरुंच्या चरणाजवळ असतात. सारे तीरथ धाम आपके चरणो मे । हे गुरुदेव प्रणाम आपके चरणो मे ।
"सद्गुरुंचे चरण" आपल्या घरास लागले म्हणजे जणु काही सर्व तिर्थच आपल्या अंगणात आले, असं समजावे.....