एकनाथ महाराजांची भारुडे कमी शब्दात मोठा आशय सांगणारी आहेत. मनुष्याच्या वर्मावर बोट ठेवणारी आहेत. म्हणून एवढा काळ लोटूनही ती आजही प्रचलित आहेत. धर्मावर ओरखडा काढणाऱ्या विचारांचे समूळ उच्चाटून नाथ महाराजांनी वेळोवेळी केले. त्यातलेच एक मागणे देवीकडे मागितले-
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥
वरकरणी भारुडातले शब्द प्रापंचिक स्त्रीचे मागणे वाटत असले तरी त्यात फार मोठा गर्भितार्थ दडला आहे. यात त्यांनी वापरलेली नाती ही विकाराचे रूपक सांगणारी आहेत. सासरा म्हणजे अहंकार, देहबुद्धी म्हणजे सासू, वासना म्हणजे जाऊ, आशा-मनीषा ही नणंद, मोह त्यांचा मुलगा, संकल्पाचा भाऊ विकल्प हा नवरा हे सगळे अध्यात्म मार्गाच्या आड येणारे आहेत, म्हणून त्यांना परस्पर खपव आणि मला एकटीलाच राहू दे म्हणजे मला वैराग्य दे असे दान देवीकडे मागितले आहे.
संसार आणि ऐहिक सुखं ही क्षणभंगुर आहेत. एक ना दिवस ती लोप पावणार आहेत. हे सत्य जितक्या लवकर मनुष्य आत्मसात करतो, तेवढा तो या मोह पाषापासून अलिप्त होतो आणि परमार्थाला लागतो. एकटे राहणे म्हणजे विलग होणे नाही तर आत्मनिर्भर होणे. हा संकेत महाराजांनी वरील भारुडातून दिला आहे. तो आदर्श आपणही डोळ्यापुढे ठेवूया आणि तन, मन, धनाने म्हणूया 'राम कृष्ण हरी!'