रोजच्या जेवणाचा कंटाळा म्हणून चवबदल म्हणत आपण हॉटेलिंग करतो. बाहेर गेलो की फास्ट फूड, जंक फूड खातो. मित्रांबरोबर पिझ्झा, पास्ता, सॅन्डविचच्या पार्टी करतो. तोवर घरच्या अन्नाची किंमत कळत नाही. पण जेव्हा मेसचे जेवण, परदेशी गेल्यावर रोजचे हॉटेलचे जेवण, खाणावळीतला डबा खाण्याची वेळ येते किंवा आठ दहा दिवस घराबाहेर असल्यावर बाहेरच्या जेवणावर गुजराण करावी लागते, तेव्हा घरच्या अन्नाची किंमत कळते!
घरचे आणि बाहेरचे जेवण यात फरक काय? दोन्ही कडे पोटभरीचे अन्न मिळते. परंतु बाहेरच्या जेवणाने रसना तृप्ती अर्थात जिभेचे चोचले पुरवले जाऊ शकतात, मात्र घरच्या जेवणाने मनाला तृप्ती येते. बाहेरच्या जेवणाने तात्कालिक समाधान वाटत असले, तरी पुढच्या दोन तासात पुन्हा भूक लागते. सोडा किंवा बटाटा,चीज, अतिरिक्त साखर यांचा वारेमाप समावेश केल्यामुळे ते अन्न पोटभरीचे ठरू शकत नाही. याउलट घरी नाश्त्यात एक पोळी/चपाती खाल्ली तरी दुपारपर्यंत भूक लागत नाही. एवढा का बरं फरक पडत असेल?
तर फरक आहे, बनवणाऱ्या हातांचा! घरचा स्वयपांक करणारी गृहिणी घरच्यांच्या प्रेमापोटी तो स्वयंपाक करत असते. तो करताना तिचा उमाळा, आपुलकी, प्रेम त्या स्वयंपाकात उतरते. त्यामुळे तो स्वयंपाक पौष्टिक आणि रुचकर होतो. हॉटेलमधला स्वयंपाकी काम उरकत असतो. त्या पदार्थाच्या चवीशी, त्याच्याशी निगडित स्वच्छता, आरोग्य याच्याशी त्याचा संबंध नसतो. गृहिणी मात्र प्रत्येक गोष्ट निवडून घेतला. प्रेत्यक जिन्नस डोळ्याखालून घालतात. घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन स्वयंपाक करतात. त्यामुळे तो स्वयंपाक सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आणि अंगी लागतो.
जेवण करणाऱ्याबरोबर वाढपी देखील महत्त्वाचा असतो. आता बुफे पद्धत आली. पूर्वी पंगती असत. पंगतीतले वाढपी आठवून बघा, झरझर वाढून पुढे निघून जात असत. त्या वाढण्यात आपुलकी नसल्यामुळे वाढणार्याचे भाव अन्नात उतरतात. लोक रुक्षपणे वाढतात, जेवणारे रुक्षपणे जेवतात. घरी आई, आजी, ताई, बायको, आत्या, मावशी, आग्रह करून जेवायला वाढतात. तो आपुलकीचा भाव नसेल तर घरच्या स्वयंपाकात आणि मेसवरच्या जेवणात काय फरक उरणार?
आपला शरीर यज्ञ चालत राहावे, यासाठी अन्नाची आहुती देहात टाकली जाते. 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म' अशी ओळ 'वदनी कवळ घेता' या श्लोकात दिल आहे त्याच्या अर्थाला जागून थोडंच, पण रुचकर अशा घरच्या जेवणाचा आस्वाद घेऊया आणि पुढच्या पिढीलाही घरच्या जेवणाचे महत्त्व पटवून देऊया! शिवाय, अन्न घरचे असो नाहीतर बाहेरचे ते वाया जाणार नाही, फेकून द्यावे लागणार नाही, त्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेऊया!