महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. मेघदूत हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध काव्य. त्याच्या सुरुवातीला पहिल्या ओळीत `आषाढस्य प्रथम दिवसे' असे वर्णन केलेले असल्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास यांना समर्पित करण्यात आला आहे. म्हणून हीच तिथी त्यांची स्मृती तिथी म्हणूनही ओळखली जाते. कालिदास यांच्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसूनही त्यांच्या गत आयुष्याबद्दल अनेक रोचक कथा सांगितल्या जातात. जसे की-
एक अशिक्षित, मूर्ख माणूस धनाच्या लोभापायी एका राजकन्येची फसवणूक करून तिच्याशी विवाह करतो. दिसायला सुंदर असल्यामुळे त्याचे अज्ञान त्याच्या रूपाआड लपते. परंतु ते सोंग फार काळ टिकत नाही आणि राजकन्येला त्याचे मूळ रूप कळते. तो गयावया करतो, पण राजकन्या त्याचा पाणउतारा करून त्याला हाकलून देते. पश्चात्ताप होउन तो जीव देण्यासाठी निघून जातो. वाटेत एक कालिमातेचे देऊळ लागते. तिथे गेल्यावर त्याची समाधी लागते आणि सात दिवसानंतर कालिमाता प्रसन्न होऊन त्याला दृष्टांत देते, `तू मरणाचा विचार सोडून दे. शिक्षण घे. कष्ट कर. सर्व कलांमध्ये, शास्त्रांमध्ये पारंगत हो आणि साहित्यनिर्मिती करून राजकन्येशी सुखाचा संसार कर.'
देवीच्या सांगण्यानुसार तो एका गुरुंना शरण जातो, त्यांच्याकडे सेवा करून ज्ञानार्जन करतो आणि बारा वर्षांच्या खडतर ज्ञानतपश्चर्येनंतर शिक्षणात परिपूर्ण होऊन विद्वत्तसभांमध्ये जातो. करता पाहता सासऱ्यांच्या राज्यात येतो, तिथेही विद्वतसभा जिंकतो. सासरे आणि त्याची पत्नी त्याला ओळखत नाहीत. तो स्वत:ची ओळख करून देत क्षमा मागतो. त्याची विद्वत्ता पाहून पत्नीही खुश होते आणि त्यांचा संसार पूर्ण होतो. असा तो विद्वान माणूस कालिमातेचा भक्त म्हणून `कालिदास' नावाने ओळखला जातो.
कालिदास हे संस्कृतमधील सर्वश्रेष्ठ कवी. रघुवंश, कुमारसंभव ही महाकाव्ये. शाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशिय ही नाटके, मेघदूत हे खंडकाव्य आणि ऋतूसंहार हे आणखी एक काव्य. याशिवाय अनेक ग्रंथनिर्मितीत कालिदासाचा हातभार लागला असण्याची शक्यता आहे. हे मूळ साहित्य संस्कृतात असले, तरीदेखील अनेक मराठी साहित्यिकांनी त्याचा मराठीत रसाळ भावानुवाद केलेला आहे. त्यामुळे या साहित्यपर्वणीचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे.