>>विनीत वर्तक
भारतातील अनेक मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे. काही मंदिरांचा इतिहास तर त्यांच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. मंदिर कुठे उभारायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला. ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं तिथलं वातावरण, तिथल्या नैसर्गिक गोष्टी तसेच पुढे येणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा अभ्यास केला गेल्यावर ज्या ठिकाणी ह्या गोष्टी जुळून येतील अशा ठिकाणी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती केली गेली. ही निर्मिती करताना कळलेल्या तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन अशा ठिकाणांचं महत्त्व धार्मिक दृष्टीने वाढवलं गेलं. खंत एकच, की ह्यातलं तंत्रज्ञान ह्या श्रद्धेमुळे येणाऱ्या पुढच्या काळात लुप्त झालं आणि परकीय आक्रमणांनी भारताच्या अनेक पिढ्यांच्या तंत्रज्ञानातील समृद्धीची वाट लावली.
श्रीकृष्णाला आणि त्याच्या भावंडांना वाहिलेलं एक मंदिर भारतात गेल्या ९०० वर्षांहून जास्त काळ उभं आहे. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा ह्या तीन देवतांना समर्पित असलेलं पुरी, ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर!
आपल्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध असणारं हे मंदिर अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेलं आहे. आत्ता जे मंदिर उभं आहे त्याची निर्मिती साधारण १२ व्या शतकात इ.स. १११२ च्या आसपास झाली असावी असा अंदाज आहे. हे मंदिर आत्तापर्यंत १८ वेळा लुटलं गेलं आहे. इतकं लुटूनसुद्धा आजही ह्याच्या खजिन्यामध्ये जवळपास १२० किलोग्राम सोनं तर २२० किलोग्रॅमपेक्षा जास्त चांदी आहे. ज्याची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये आहे. ह्याशिवाय अनेक अमूल्य रत्नेही त्याच्या खजिन्याचा भाग आहेत.
ह्या पूर्ण मंदिराचं क्षेत्र जवळपास ४००,००० चौरस फूटात सामावलेलं आहे. मुख्य मंदिर हे कर्व्हीलिनियर आकारात असून त्याची उंची जवळपास २१४ फूट (६५ मीटर ) आहे. ह्याच्या शिखरावर एक चक्र ज्याला नील चक्र असंही बोललं जाते, ते बसवलेलं आहे. हे नील चक्र अष्टधातूंनी बनवलेलं आहे. ११ मीटर चा घेर आणि ३.५ मीटरची उंची असलेलं हे चक्र जवळपास वजनाने १००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. हे चक्र ९०० वर्षांपूर्वी ६५ मीटर उंचीवर कसं नेलं गेलं असेल हे अजूनही एक रहस्य आहे.
आधी म्हटलं त्याप्रमाणे मंदिराची जागा निवडताना अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळी केला गेला होता. भारताच्या ज्या भागात पुरी मधलं जगन्नाथ मंदिर आहे तो भाग शंखाच्या आकाराचा आहे. शंख आणि चक्र ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विष्णूच्या मूर्तीत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. म्हणूनच ह्या भागाला शंख क्षेत्र म्हटलं जातं. ह्याशिवाय ह्या जागेची निवड करताना इथल्या काही नैसर्गिक गोष्टींवर खूप अभ्यास केला गेला आहे. जगात कुठेही दिवसा हवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने वाहते तर रात्री ह्याविरुद्ध म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वहाते. पण ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे नेमकं उलट घडतं. जगन्नाथ मंदिराच्या इथे दिवसा हवा जमिनीवरून समुद्राकडे वाहते तर रात्री उलट्या दिशेने म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहते.
जगन्नाथ मंदिराच्या भोवती अनेक रहस्यं गुंफली आहेत. त्यातली काही महत्त्वाची आहेत ती म्हणजे इकडे देवळाचा फडकणारा झेंडा हा वाऱ्याच्या उलट्या दिशेला फडकतो. ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला झेंडा फडकायला हवा पण इकडे नेमका तो उलट दिशेला फडकतो. तसेच ह्या मंदिरावरून काहीच उडत नाही. ह्या मंदिरावरून कोणतेच पक्षी उडत नाहीत किंवा मंदिराच्या शिखराचा आसरा घेत नाहीत. तसेच ह्या मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही. दिवसाची कोणतीही वेळ घेतली तरी ह्याच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. ह्यामागे श्रद्धा आणि चमत्कार लोकांनी म्हटलं असलं तरी मंदिराच्या जागेची निवड आणि मंदिर बांधण्यामागील तंत्रज्ञान ह्या सगळ्याला कारणीभूत आहे.
भारतातल्या मंदिरांची शिखरं ही वर निमुळती होतं जाणारी आणि साधारण चपटी असलेली बांधली जातात. पण जगन्नाथ मंदिर ह्याला अपवाद आहे. हे मंदिराचं शिखर थोडफार गोलाकार स्वरूपात बनवलं गेलं आहे. देवळाच्या शिखरावर फडकणारा झेंडा उलट दिशेला फडकण्यामागे ह्या मंदिराचा आकार कारणीभूत आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे 'कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट' बघायला मिळतो. एकसंध वाहणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या प्रवाहात जर आपण टोकेरी नसलेली साधारण गोलाकार एखादी गोष्ट आणली तर त्याच्या प्रवाहात त्या वस्तूमुळे बदल होतो आणि हा बदल अगदी विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे हवा वाहताना मंदिराच्या साधारण गोलाकार असणाऱ्या शिखराला आदळून 'कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्ट' तयार करते. ज्यामुळे काही भागात हवा उलट्या दिशेचा प्रवाह निर्माण करते. हाच विरुद्ध दिशेचा प्रवाह झेंड्याला हवेच्या अगदी विरुद्ध दिशेला फडकवतो.
ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येत असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत. ह्या मंदिराच्या शिखरावर जे नील चक्र आहे ते पूर्ण पुरी मधून बघताना कुठूनही तुम्हाला ते समोरून बघत आहात असेच दिसून येते. ह्या मागे कारण आहे ते पुरी शहराची रचना आणि त्याला अनुसरून मंदिराचं केलेलं बांधकाम. ज्या भागातून ह्या चक्राचा बाजूचा भाग दिसण्याची शक्यता आहे. त्या सर्व भागात एकतर तुरळक वस्ती आहे किंवा मंदिराच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतींमुळे मंदिराचं शिखर दिसत नाही. त्यामुळेच जिथे लोकवस्ती अथवा जिथून मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं त्या सर्व भागातून चक्र आपण समोर बघत आहोत असा भास होतो.
नील चक्र जे मंदिराच्या शिखरावर बसवलं गेलं आहे, ते अष्टधातूंच्या संयुगातून बनवलं गेलं आहे. त्यामुळे आज ९०० वर्षांनंतरही समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेला मात देत टिकून आहे. मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो.
कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट असो वा पुरीच्या कोणत्याही भागातून दर्शनी दिसणारं नील चक्र असो. ह्या मंदिराची निर्मिती करताना त्याच्या बांधकामाची सावली ही त्याच्या बांधकामावर पडते. त्यामुळे जमिनीवर सावली दिसणार नाही अश्या पद्धतीने केलेलं बांधकाम. प्रत्येक गोष्टीची निवड ही पूर्ण विचारांती मंदिर निर्माण करताना केली गेली आहे. ह्या गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीचं रूप दिलं असलं तरी मंदिर उभारताना वापरल्या गेलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. जागेची निवड ते मंदिराचा आकार आणि ते उभारताना वापरल्या गेलेल्या विज्ञानामुळे आजही इतके वर्षांनंतर हे मंदिर आपल्या सोबत अनेक रहस्यं घेऊन दिमाखात उभं आहे. रथयात्रेसारखी जवळपास १८०० वर्षांची परंपरा असलेली यात्रा जितकी जगभरात जगन्नाथ पुरी ची शान आहे तितकंच ह्या मंदिराच्या निर्मिती मागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान!!!