>> ज्योत्स्ना गाडगीळ
भगवद्गीतेची निर्मिती होऊन ५००० हून अधिक वर्षे उलटून गेली. तरीदेखील आजही हा धर्मग्रंथ प्रमाण मानला जातो. अनेक लेखक, कवी, चित्रकार गीतेवर प्रभावित होऊन त्याचे अन्वयार्थ आजतागायत शोधत आहेत. त्यावर नवनिर्मिती करत आहेत. आयुष्यातील कोणत्याची प्रश्नाचे उत्तर गीतेत सापडते असे अनेक थोरा मोठ्यांनी लिहून ठेवले आहे.
परंतु गीतेची निर्मिती का झाली, या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेत प्रा. राम शेवाळकर एका व्याख्यानात म्हणाले होते, 'गीता ही श्रीकृष्णाला उपदेश करण्यासाठी नसून त्याच्या मनातील आणि त्याच्यासारखी अवस्था होणाऱ्या प्रत्येक अर्जुनाच्या मनातील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सांगितलेले तत्वज्ञान आहे.'
म्हणजे नेमके काय? तर शेवाळकर सांगतात, 'कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज झालेल्या अर्जुनाला ऐनवेळेवर हे कळले का, की शत्रूपक्षात आपलेच काका, मामा, आजोबा, शिक्षक, भाऊ लढायला उभे आहेत? नाही! याची त्याला पुरेपूर कल्पना होती. कौरवांशी सामोपचाराचे बोलणे करायला जाण्याआधी श्रीकृष्णाने पांडवांची बैठक घेतली होती. सर्वानुमतीने युद्धाला वाचा फोडली होती. पांडवांची आई कुंती , तिला विचारले असता तिनेही युद्धाला पर्याय नाही असे सांगितले होते. याअर्थी अर्जुनाला परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. असे असूनही ऐन युद्धभूमीवर जेव्हा त्याने आपल्या नातलगांना प्रत्यक्ष आपल्या विरुद्ध उभे असल्याचे पाहिले, तेव्हा त्याच्या हातून गांडीव धनुष्य गळून पडले आणि त्याने श्रीकृष्णाला सांगितले, 'मला युद्ध करता येणार नाही.'
त्यावेळेस कृष्णाने त्याला बळ देऊन, सत्यपरिस्थितीची जाणीव देऊन गीतेचे तत्त्वज्ञान आटोपते घेतले असते आणि महाभारताच्या युद्धाबरोबर गीतादेखील लोप पावली असती. परंतु तसे झाले नाही, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाच्या डोळ्यावरील मोहपटल बाजूला सारले आणि कर्तव्याचे भान दिले. त्याची समजूत घातली. तू ज्यांना नातेवाईक म्हणतोय, तेदेखील युद्ध करायला, तुम्हा पांडवांना संपवायला शस्त्र घेऊन सज्ज झाले आहेत. असे असताना तू त्यांना आपले समजून कर्तव्यच्युत होऊ नकोस. आपले म्हणवणारे लोकच आपल्या विरुद्ध जातात, तेव्हा आयुष्यात महाभारताची सुरुवात होत़े अशा वेळी गर्भगळीत होणे योग्य नाही. हीच ती वेळ आहे, कर्तव्याला जागण्याची! कर्तव्य पूर्ण करणे हेच नरदेहाचे सार्थक आहे. त्या कर्तव्याला चुकू नकोस. हे सांगून श्रीकृष्णाने अखिल जगाला ज्ञानामृत पाजले आहे. म्हणून गीता महाभारतानंतरही अमर राहिली.
ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे.