मराठी वर्षातील पौष महिन्यात येणारा महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत. मकरसंक्रांतीला नवग्रहांचा राजा सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या मकर राशीतील संक्रमणाला मकरसंक्रांती असे म्हटले जाते. मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असल्याने प्रयागक्षेत्री यात्रा भरते. या दिवशी दानालाही महत्त्व असते. मात्र, महाभारत काळात भीष्म पीतामह यांनी देह ठेवण्यासाठी हाच दिवस का निवडला, या दिवसाचे महत्त्व काय, जाणून घेऊया काही पौराणिक मान्यता... (Makar Sankranti 2022)
महाभारताचे युद्ध १८ दिवस चालल्याचे सांगितले जाते. महाभारतातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे भीष्म पीतामह. अनेक कारणांनी भीष्म पीतामह महाभारतात वेगळे ठरतात. भीष्माचार्यांना इच्छा असेल, तेव्हाच मरण येईल असा वर मिळाला होता. त्यामुळे युद्धात शिखंडीला पुढे करून अर्जुनाने त्यांच्यावर बाण मारताच ते घायाळ होऊन पडले. त्या वेळी दक्षिणायन होते. अंधाराचे प्राबल्य होते. मात्र उत्तरायणात अंधार कमी कमी होऊ लागतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. म्हणून आपल्याला मृत्यू उत्तरायण सुरू झाल्यानंतरच मिळावा, अशी भीष्माचार्यांनी इच्छा प्रगट केली.
भीष्म पीतामह यांच्या इच्छेप्रमाणे अर्जुनाने बाणांची शय्या तयार केली आणि त्यावर पडलेले भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत २८ दिवस शरशय्येवर पडून राहिले. शेवटी उत्तरायणात त्यांनी प्राण सोडले. यावरून एखादा माणूस बरेच दिवस आजारी असून मरायला टेकला असेल आणि त्याचा प्राण जात नसेल, तर तो शरपंजरी पडला आहे, असा शब्दप्रयोग रूढ झाला. कृष्णानेही उत्तरायणाचे महत्त्व सांगितले आहे. उत्तरायणात शरीराचा त्याग केल्याने जीवन-मरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते. माणसाला थेट मोक्ष मिळतो. यामुळेच भीष्म पितामहांनी प्राणत्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायण होण्याची वाट पाहिली, असे सांगितले जाते.
महाराष्ट्रातील मकरसंक्रांती
महाराष्ट्रात मकरसंक्रांतीच्या दिवशी सवाष्णी सुघड पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. घरी, देवळात हळदीकुंकू समारंभही केले जातात. आपल्याकडे तीळगूळ, तिळाचा हलवा, तिळाच्या वड्या एकमेकांना देऊन तीळगूळ घ्या गोड बोला, असा स्नेहाचा संदेश दिला जातो. तसेच या दिवशी संक्रांतीने संकरासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केले. तर दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला. म्हणून या दोन दिवसांना संक्रांत आणि किक्रांत अशी नावे पडली, असे सांगितले जाते. या दिवशी श्राद्ध करण्याचीदेखील प्रथा आहे.
तीळ संतती वृद्धीचे प्रतीक
कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. ग्रामस्थ मंडळी देवीला तीळगूळ द्यायला येतात. देवीच्या ओटीच्या साहित्यात गहू किंवा तांदळांबरोबर उसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेगा असे पदार्थही असतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते. त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले. भारतभर हा सण वेगवेगळ्या तऱ्हेने पण सारख्याच उत्साहाने साजरा केला जातो. त्याच्या तऱ्हा भिन्न असल्या तरीही उद्देश सूर्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणे; तसेच आपापसातील स्नेहभाव वृद्धींगत करणे हाच असतो.