लाडकी लेक माहेरी आली की घर आनंदून जाते. लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलचं आकर्षण, प्रेम, ओढ तसूभरही कमी होत नाही. माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही. अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो. जशी तगमग तिची होते, तशीच घरच्यांचीदेखील होते. म्हणून पूर्वी पाठवणी करताना एक नियम पाळला जात असे, तो म्हणजे लेकीला बुधवारी सासरी न पाठवण्याचा!
बुध प्रदोष व्रतात सापडते कारण...
बुध प्रदोष व्रत कथेनुसार एक पुरुष आपल्या नव्या नवरीला नेण्यासाठी सासरी गेला. जुन्या काळातला विवाह असल्याने पत्नीने आपल्या पतीला नीटसे पाहिलेही नव्हते. ते दोघे घरी जायला निघाले तो बुधवार होता. प्रवासात तिला तहान लागल्याने तिने खाली मानेनेच पतीला पाणी आणायला सांगितले. बैलगाडीचा प्रवास थांबवत पती पाणी शोधायला गेला. थोड्यावेळाने पाणी घेऊन आला आणि पाहतो तर आपली बायको परपुरुषाशी बोलत त्याने दिलेले पाणी पित आहे. त्याला खूप राग आला. तो तावातावाने गेला. बायकोशी भांडू लागला. आधी पाणी घेऊन आलेला हाच आपला नवरा आहे असे वाटून तिने पाणीही प्यायल्याने सांगितले आणि आपल्या चुकीची कबुली दिली. तरी नवऱ्याचा राग जाईना. अशा वेळी तिने महादेवाची प्रार्थना केली. तेव्हा महादेवाच्या कृपेने तो परपुरुष न बोलता तिथून निघून गेला आणि नवं दाम्पत्याचे भांडण मिटले. महादेवामुळे त्यांचा काडीमोड होता होता वाचला म्हणून त्यांनी बुध प्रदोष व्रत सुरु केले आणि बुधवारी सासरी निघायचे नाही असा संकल्प केला.
व्रताचे सार :
आताच्या काळात या कथांचे वाचन करताना आपल्याला भाबडेपणा जाणवत असला तरी येनकेन प्रकारेण देवभक्ती रुजवण्याचा, नाती सांभाळण्याचा आणि प्रामाणिक राहून नैतिकता जपण्याचा संस्कार या कथांमधून केल्याचे दिसून येते. त्यामुळे आपणही भोळा भाव लक्षात घेऊन श्रद्धेने काही गोष्टींचे आजही पालन करतो.
पूर्वीची म्हण :
'जाशील बुधी, तर येशील कधी?' बुध प्रदोषाच्या व्रतकथेवरुन ही म्हण आली असावी. पूर्वी आई-आजी म्हणत की बुधवारी गेलीस तर पुढचा बराच काळ सासरी परत येणार नाहीस अशी काळजी व्यक्त केली जात असे. या मायेपोटी लेकींना बुधवारी सासरी न पाठवण्याची प्रथा सुरु झाली असावी.
सद्यस्थिती :
पूर्वी माहेर-सासर दूर दूर असल्याने लेकीच्या येण्याकडे घरच्यांचे डोळे लागलेले असायचे. मात्र सद्यस्थितीत अनेक जणींचे माहेर अगदी हाकेच्या अंतरावर असते. फार फार तर एका दिवसात जाऊन परत येण्यासारखे असते. तसेच सासरच्या अटी शिथिल झाल्यामुळे वरचेवर माहेरी जाणे होते. त्यामुळे पूर्वीसारखे माहेरी जाण्यासाठी ताटकळत बसावे लागत नाही. काही गोष्टी कालांतराने मागे पडल्या असल्या, तरी माया-मोह आणि माहेरची ओढ कधीच कमी होत नाही. म्हणून आजही अनेक घरातून माहेर वाशिणींना बुधवारी सासरी पाठवणे टाळले जाते.