'नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' असे तुकाराम महाराजांनी एका पदात म्हटले आहे. खरोखरच केवळ नामस्मरणाने पापांचे निवारण होते का? होत असेल तर कसे? ते पहा-
नामात शक्ती जितुकी पाप संहराया,पाप्या न शक्ति तितुकी पाप ते कराया।।
नामस्मरणाचे महात्म्य साऱ्या संतांनी एकमुखाने वर्णन केले आहे. कलीयुगात तर त्याची थोरवी फार मोठी असून नामस्मरणाला पर्यायच नाही. खरोखरच स्मरणयुक्त नाम घेणाऱ्याच्या मनात अशुभ असे पापाचरणाला प्रवृत्त करणारे विचारच येत नाहीत. परमात्म्याने आपली सारी शक्ती नामाच्या ठिकाणी ठेवलेली असल्याने नामाच्या अनुसंधानाने संचित जळून जाणयास मदत होते. प्रारब्धाचा क्षय होतो विंâवा प्रारब्धभोग सुसह्य होतात आणि क्रियमाणाची निर्मितीच थांबते असे हे अपार नाममहात्म्य आहे.
नाम घेतल्याने जितक्या झपाट्याने पापरंहार होतो, तितकीच नवीन पापकर्मे करण्याची शक्तीही खालावते. सारे संत, सत्पुरूष, भक्त सतत नामस्मरण करत असतात. कारण त्याने शुद्धी होते आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, या उक्तीप्रमाणे नामाने त्यांना देवाचा सहवास जाणवू लागतो. आत्मारामाची जवळीक होऊ लागते व त्या आनंदाची धुंदी फक्त नाम जपणाऱ्यालाच अनुभवता येते. शारीरिक व मानसिक शुद्धी म्हणजेच आत्मसाक्षात्कार. तुकोबराय स्वानुभव सांगतात,
देह देवाचे राऊळ, आत बाहेर निर्मळ,देव पहावयासी गेलो, तेथे देवचि होऊन गेलो, तुका म्हणे धन्य झालो, आम्ही विठ्ठलासी भेटलो।
खरोखरच, आरोग्य, मन:शांती, आत्मिक बळ आणि ईश्वरप्राप्ती यासाठी नामस्मरणासारखे साधन नाही. मात्र प्रपंच जसा सुरुवातीला अतिशय गोड लागतो, पण पुढे कमालीचा कटू होतो, त्याच्या अगदी उलट नामस्मरण सुरुवातीला फणसाची साले काढण्याइतके कंटाळवाणे वाटते, पण एकदा गोडी लागली की आतल्या गराची माधुरी अवीटच!