>> विष्णू कुडके
धार्मिक कार्यक्रम झाल्यावर आणि भोजन झाल्यावर त्वरित केर काढू नये असे आपले पूर्वज सांगत असत. आपण आजही तो नियम पाळतो. काही सांडलं, लवंडलं असेल तर फडक्याने गोळा करतो आणि पोतं करून जागा स्वच्छ करतो. मात्र केरसुणी वापरत नाही. यामागितलं शास्त्र जाणून घेऊ.
'देवी भागवत मध्ये कीटकांना जगदंबेने आणि विष्णूंनी वरदान दीले आहे की यज्ञात जमिनीवर पडलेले अन्न उदा तांदूळ, गहू डाळ हावनीय द्रव्य आदी वर तुमचा अधिकार असेल आणि ते अन्न तुम्ही घेतल्याशिवाय यज्ञ पूर्ती होणार नाही! ' त्यामुळे एक कण तरी यज्ञातील द्रव्य कीटकांना मिळाला पाहिजे आणि केर काढल्यावर ते होत नाही, म्हणून केर काढू नये असे शास्त्र आहे. म्हणून थोडा वेळ किमान दोन घटका केर काढू नये. तर भोजन झाल्यावरच केर काढणे क्रमप्राप्त आहे.
आणि दुसरे कारण असे की केरसुणी चा ध्वनी शब्द झाला की आवाहित देवता विसर्जन होतात असाही एक नियम आहे. त्यामुळे अगदीच नाईलाज म्हणून केर काढावा लागला च तर मोळाच्या झाडूने हळुवार आवाज होणार नाही अशा पद्धतीने काढावा.
अशावेळी पर्याय म्हणून फडक्याचा वापर करावा. केर किंवा तत्सम गोष्टी फडक्याच्या साहाय्याने कागदावर किंवा एखाद्या कार्डवर भरून घ्याव्यात. रोज वापरात असलेली केराची सुपली वापरू नये. साध्या कागदावर केर भरून टाकावा किंवा घरातल्या दुसऱ्या कोनाड्यात बाजूला सारावा. मात्र केरसुणीचा उपयोग तत्काळ करू नये.
आपण पूजाअर्चना करतो तेव्हा धर्माशी संबंधित या छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घ्यायला हव्यात. अजाणतेपणी गोष्टी घडतात तेव्हा नाईलाज असतो, परंतु संबंधित विषयांचे ज्ञान मिळाल्यावर चुकांची पुनरावृत्ती करू नये.