लग्न हा केवळ विधी नाही, तर दोन जिवांचे, कुटुंबांचे मनोमिलन आहे. हे कार्य देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने, चार-चौघांच्या उपस्थितीत, त्यांच्या आशीर्वादाने पार पडावे, अशी आपली पूर्वापार रित चालत आलेली आहे. परंतु, लग्नातील अतिरिक्त खर्च, हुंडा देऊन कर्जबाजारी झालेले वडील, पाण्यासारखा वाहणारा पैसा पाहून अनेक तरुण-तरुणींनी रजिस्टर लग्न पद्धतीचा मार्ग अवलंबिला. परंतु, लग्नाच्या नावावर घडणारे खर्चिक प्रकार मूळ चालीरितींना धरून नाहीत. त्यामुळे लग्न पद्धतीचे उच्चाटन करून त्यातील विधींना नाकारून रजिस्टर लग्न करणे, आजही घरातील ज्येष्ठ मंडळींना पटत नाही. कारण, हिंदु लग्न पध्दतीतील सर्व विधींमागे संस्कार आहेत. दांपत्य जीवन सुखाचे जावे, म्हणून मंत्र संस्कार आहेत, एकमेकांप्रती समर्पण भावना असावी म्हणून वचने आहेत.
आपली लग्नपद्धती अतिशय उत्कृष्ट, उदात्त व पवित्र आहे. रजिस्टर लग्नात यातील एकही गोष्ट नाही. लग्न रजिस्टर तरी का करायचे? रजिस्टर न करताही नवरा बायकोसारखे राहिले, तरी प्रपंच हेणार नाही का? मुले होणार नाहीत का? सर्व काही होऊ शकते, मग लग्न रजिस्टर करण्याची तरी काय गरज आहे? याउलट धार्मिक विधी केल्याने पति पत्नीमध्ये जो पवित्रभाव निर्माण होतो तो रजिस्टर केल्याने होत नाही. आपल्या लग्न पद्धतिची वैशिष्ट्ये पहा...
या पद्धतीत प्रथम पुण्याहवाचन केले जाते. पुण्य म्हणजे पुण्यकारक. अह म्हणजे दिवस. वाचन म्हणजे म्हणणे. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या तो दिवस चांगला असला, तरी विद्वान जाणकारांनी तो पुण्याह आहे म्हटले की त्यावर शिक्कामोर्तब होते.
मनुष्य जन्माला येतो, तो देव, ऋषी आणि आचार्य यांचे ऋण घेऊन, असे शास्त्र सांगते! पुण्याहवाचनात या तिघांनाही संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा विधी आहे. गणपती, गौर्यादिदेवता यांचे पूजन आहे. नांदिश्राद्ध आहे. नांदिश्राद्ध म्हणजे वृद्धीश्राध्द. मंगलकर्माची वृद्धी व्हावी आणि पितर संतुष्ट व्हावेत हा यात हेतू आहे. हे पुण्याहवाचन पुष्कळ ऋषींनी तयार केले आहे. ते करताना ऋषींना जो आनंद झाला, तो ऐकणाऱ्यालाही मिळतो. संतुष्ट झालेले देव, ऋषि, आचार्य, पितर कर्त्याला आशीर्वाद देतात. धन धान्ययुक्त करतात, म्हणून लग्न हे विधिवतच करावे.
याशिवाय लग्नाच्या वेळेस गुरुजी प्रत्येक विधीचा अर्थ समजावून देतात, तेव्हा नीट लक्ष दिले, तर लग्नसंस्काराचे महत्त्व काय आहे, ते आपल्याला लक्षात येईल. म्हणून लग्न धुमधडाक्यात केले नाही तरी चालेल, पण विधीवत व्हावे, ही घरातील ज्येष्ठ मंडळींची अपेक्षा गैर नाही.