२२ जानेवारी २०२४ हा दिवस समस्त भारतीयांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. कारण अयोध्येच्या राममंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जिथे आधीही रामाचेच मंदिर होते, त्याच ठिकाणी मंदिराची पुनर्बांधणी केल्यावर नवीन मूर्ती बसवताना प्राणप्रतिष्ठा का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर सदर माहिती सविस्तर वाचा.
वास्तविक चराचरात परमेश्वर भरलेला असतो. त्यामुळे मूर्तीमधयेही तो असतोच याविषयी संदेह नाही. पण मानवाच्या उन्नतीसाठी व आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वरविषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही. कारण त्याला हवा असतो `देव' आणि तोही चराचरातील नव्हे, तर समोर ठेवलेल्या मूर्तीमधील देव!
अशा वेळी मनाचे, नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा फोटोवाचून गत्यंतरच नसते. मूर्तीमुळे त्याची देवाविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते. तो आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो. त्या मूर्तीकडे पाहताच त्याला जप करावा वाटतो व मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचे चरित्र मनात सारखे घोळत राहते.
अशा वेळी मूर्ती निर्जीव व चेतनाहीन असूनही वरील कार्ये घडतात. तर मग त्या मूर्तीतून कंपने , स्पंदन लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकेल? ही कंपने , स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात. मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसांचे वास्तव्य घडले की आपोआपच त्या मूर्तीमधील देवत्त्व जागृत होऊ लागते.
शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा, प्रतिष्ठा सांगितलेली आहे. त्यात जलाधिवास, धान्यराशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंगे आहेत. ती सर्व प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. केवळ नुसती स्थापन केलीली एखादी मूर्तीदेखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते.
ज्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहित नसेल तेव्हा त्या मूर्तीची समंत्रक, षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करूनदेखील त्या मूर्तीमध्ये देवत्त्व येते. वरचेवर पंचामृत, अभिषेक, उद्वार्जन (मूर्ती स्वच्छ करणे), आरती, नवरात्रविधी इ. सोपस्कारांनी मूर्तीमध्ये देवत्व सिद्ध होऊन ती मूर्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकते.