ज्योत्स्ना गाडगीळ
नवीन वर्षात प्रत्येकाचे काही ना काही संकल्प असतात. ओळखीतल्या एका मावशींनी जरा हटके संकल्प केला, तो म्हणजे बीजेचा चंद्र पाहण्याचा! आजवरच्या ऐकीव माहितीनुसार बीजेचा चंद्र पाहणे शुभ आहे, हे माहित होते. परंतु, तो पाहण्याचा कोणी संकल्प करेल, असे वाटले नव्हते. परंतु मावशींच्या या संकल्पामुळे बीजेच्या चंद्राने उत्सुकता वाढवली.
हेही वाचा : तुमच्या राशीचे दुर्गुण कोणते ते वाचा आणि त्यावर मात करा.
बीजेचाच चंद्र का?अमावस्येनंतर येणाऱ्या शुद्ध द्वितीयेला बीज असे म्हणतात. महिन्यातून दोनदा ही तिथी येते, परंतु अमावस्येनंतर चंद्राची प्रतिमा वर्धिष्णु होत असते, तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या द्वितीयेला चंद्राचा क्षय होत असतो. आपल्या आयुष्याचा आलेख चढता राहावा, म्हणून वाढत्या चंद्रकोरेचे दर्शन घेतले जाते. मग प्रश्न उपस्थित होतो, 'बीजेचा'च चंद्र का? कारण, अमावस्येला चंद्राच्या अनुपस्थितीमुळे अंधारमय झालेल्या आकाशात प्रतिपदेला चंद्रदर्शन होत नाही. बीजेला चंद्राची नाजुक कोर दिसते, तीही रात्रभर नाही, तर अवघे काही क्षण! ती प्रतिमा डोळ्यात साठवून घेण्यासाठी, तो क्षण गाठण्यासाठी पूर्वीचे लोक पंचांगात चंद्रोदयाची वेळ बघत असत आणि ठरलेल्या क्षणी चंद्रदर्शन घेत असत. असे सहस्र चंद्रदर्शन घेतल्यावर वयाच्या ऐंशी व्या वर्षी सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला जात असे. बीजेचा चंद्र आणि सहस्रचंद्रदर्शन सोहळा
मनुष्याचे आयुष्य फार फार तर १०० वर्षे आणि सोहळा १००० चंद्रदर्शनाचा, हे गणित कसे काय? तर मराठी कालगणना चांद्रदर्शीय आहे. त्यानुसार चंद्रदर्शन असे मोजले जाते- ८० वर्षांत दर महिन्याला एकदा असे १२ x ८०= ९६०़ म्हणजे ८० वर्षांत १००० चंद्र पाहिले जात नाहीत. म्हणून ८१ वर्षे पूर्ण झाल्यावर १००० व्या पौर्णिमेला सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करतात. तसेच काही ज्योतिषांच्या मते ८० वर्षे आयुर्मान असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात ३२ अधिक मास येतात, त्यानुसार ८१ व्या वर्षात ८ व्या महिन्यात १००० चंद्रदर्शन पूर्ण होते, असे गृहित धरता येते. यावर शौनक ऋषिच्या विवेचनाच्या आधारे ‘वयोवस्थाभीधशांतीसमुच्चय:’ ह्या पुस्तकात धर्मशास्त्र कोविद श्री नारायण शास्त्री जोशी, यांनी दिले आहे. त्यांच्या मते दरवर्षी सुमारे १२ अशी ७९ वर्षात ९४८ चंद्र दर्शने आणि खग्रास चंद्रग्रहणा नंतर नव्याने होणारे चंद्रदर्शन व असे २४ चंद्रदर्शन एवढे मिळून ९४८ + २८ + २४ = १००० चंद्रदर्शन होतात. ८० व्या वर्षानंतर ८ व्या महिन्यात केलेला विधी हा सौर कालगणनेनुसार असतो. म्हणजे वैखानस गृह्य सूत्रानुसार रविवर्षेण असते. शांती साठी देवता आणि हवन सामग्री पण ठरलेली आहे. सहस्त्र चंद्र दर्शनाला देवता आहे चंद्र आणि हवन सामग्री आहे आज्य. ह्या शान्तींच्या वेळी देवतेला हवन अर्पून त्या व्यक्तीच्या आयुरारोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यायोगे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य सुखात जाते. हिंदू परंपरेनुसार सहस्र चंददर्शन विधी केला असता, त्या माणसाला मरेपर्यंत बळ आणि निरोगी आयुष्य प्राप्त होते. उतार वयात आपल्यासाठी आपल्या नातलगांनी सहस्र चंद्र दर्शन सोहळा आयोजित करून आपले कोडकौतुक केले, ही भावनादेखील ८१ वर्षे वयाच्या व्यक्तीच्या मनाला उभारी देणारी ठरते.
बीजेच्या चंद्राचे महत्त्व :अमावस्येनंतर चंद्र कलेकलेने वाढत जातो. चंद्र हा कर्तृत्त्वाचे प्रतिक मानला जातो. म्हणून आपल्या भावाचे कर्तृत्त्व उजळून निघावे, यासाठी बहिणी भाऊबीज साजरी करतात. आपल्या भावाचे कर्तृत्त्व चंद्राप्रमाणे उजळून निघावे, अशी ती प्रार्थना करते आणि भावाला पंचारतीने ओवाळते.
आपली हिंदू संस्कृती पंचभूतांना देव मानून त्यांची प्रतिकात्मक पूजा करते. परंतु, या विधींव्यतिरिक्त थेट निसर्गाशी आपला संबंध यावा, निसर्ग जोपासण्याकडे आपला कल असावा, स्नेह असावा, यादृष्टीने आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी ही व्यवस्था लावून दिलेली आहे. चंद्राची शितलता आपल्या मनात आणि आयुष्यात उतरावी, असे तुम्हालाही वाटत असेल, तर चला, आजपासून बीजेचा चंद्र पाहण्याचा आपणही संकल्प सोडूया.
आज बीजेचा चंद्र पाहता येईल. चंद्रोदयाची वेळ : सायंकाळी १८.१९ मीनिटे.